कोकणचे मिनी महाबळेश्वर मानले जाणाऱ्या दापोली तालुक्यातील मुरुड येथे येत्या शुक्रवारपासून राज्य पर्यटन महामंडळातर्फे प्रथमच ‘डॉल्फिन-कासव महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत राज्यातील पर्यटन स्थळांच्या नकाशावर दापोलीचे नाव ठळकपणे दिसू लागले आहे. मुख्य शहराबरोबरच आजूबाजूच्या समुद्रकिनाऱ्यांवरील गावांमध्येही पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मुंबई-पुण्यापासून सुमारे चार तासांच्या अंतरावर असल्यामुळेही झपाटय़ाने दापोली पर्यटनप्रिय झाले आहे. या स्थितीचा आणखी लाभ उठविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने येत्या शुक्रवार ते रविवापर्यंत (१५ ते १७ मार्च) खास महोत्सव आयोजित केला आहे. या परिसरातील समुद्रामध्ये आढळणारे डॉल्फिन आणि शेजारच्या मंडणगड तालुक्यातील वेळास येथे नैसर्गिक वातावरणात होणारी ऑलिव्ह रिडले कासवांची वीण यानिमित्ताने पर्यटकांना पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
मुरुडच्या सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या सहकार्याने होत असलेल्या या महोत्सवाबद्दल माहिती देताना महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले की, कोकणातील समृद्ध जैवविविधतेचे दर्शन पर्यटकांना घडावे या हेतूने महामंडळाने विशेष उपक्रम सुरू केले आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्य़ात डहाणू येथे चिक्कू महोत्सव यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. येत्या शुक्रवारपासून मुरुड-हर्णेच्या निसर्गरमणीय समुद्रकिनाऱ्यावर होत असलेल्या या महोत्सवात पर्यटकांना डॉल्फिन आणि कासवांच्या नैसर्गिक पैदाशीचा अनुभव देण्याचा मनोदय आहे. म्हणूनच या महोत्सवाला तसे अभिनव नाव देण्यात आले आहे. हर्णेपासून सुमारे दीड तासाच्या अंतरावर असलेल्या वेळास येथील कासवदर्शनासाठी कासव मित्रमंडळाचे सहकार्य लाभले असून तेथे या काळात सुमारे ५०० निवासांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोकणातील चविष्ट मालवणी मत्स्याहार आणि उकडीचे मोदक व सोलकढीचा आस्वाद या महोत्सवात पर्यटकांना घेता येणार आहे. राज्याच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित खास कोकणी जाखडी नृत्यामध्ये पर्यटकांनाही सहभागी होता येणार आहे.
महाराष्ट्राप्रमाणेच देशाच्या अन्य भागांतील आणि परदेशी पर्यटकांनाही या महोत्सवासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करून डॉ. पाटील म्हणाले की, कोकण प्रदेशातील अस्पर्शित निसर्गसौंदर्याचे दर्शन या पर्यटकांना होणार असून येत्या काही वर्षांत राज्यातील प्रमुख पर्यटन उपक्रमांमध्ये या महोत्सवाचा समावेश होईल, असा विश्वास आहे.
दरम्यान अशा प्रकारे भव्य स्वरूपात प्रथमच होत असलेला हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सुवर्णदुर्ग पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष शैलेश मोरे आणि महामंडळाच्या सरव्यवस्थापक किशोरी गद्रे विशेष प्रयत्न करत असून त्या संदर्भात अधिक माहितीसाठी मोरे (९४२२४३३६३९) आणि मोहन उपाध्ये, वेळास (८९८३७६७३८८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुरुडमध्ये प्रथमच ‘डॉल्फिन-कासव महोत्सव’
कोकणचे मिनी महाबळेश्वर मानले जाणाऱ्या दापोली तालुक्यातील मुरुड येथे येत्या शुक्रवारपासून राज्य पर्यटन महामंडळातर्फे प्रथमच ‘डॉल्फिन-कासव महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत राज्यातील पर्यटन स्थळांच्या नकाशावर दापोलीचे नाव ठळकपणे दिसू लागले आहे. मुख्य शहराबरोबरच आजूबाजूच्या समुद्रकिनाऱ्यांवरील गावांमध्येही पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
First published on: 15-03-2013 at 02:48 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dolphin turtle festival first time in murbad