सगळ्यात घाणेरडं शहर असं नुकतंच हिणवण्यात आलेल्या डोंबिवलीच्या सुशिक्षित, सुसंस्कृत व सुजाण नागरिकांनी आता अत्यंत गांभीर्यानं सिंहावलोकन करण्याची वेळ आलेली आहे. कुणीही यावं नी टपल्या मारून जावं हे काही बरं नाही. बाहेरचे जाऊ दे जेव्हा घरचेच लोक उकिरड्यावर ठेवतात, तेव्हा तरी उकिरडा निस्तरण्याचा विचार व्हायला हवा.
अर्थात, जेव्हा बापच म्हणतो की मुलावर घाणेरडे संस्कार झालेत, त्यावेळी बापाची त्याच्या जन्मापासून सेवा केलेल्या मुलाला जो सांस्कृतिक झटका बसेल तो तुम्हाला बसलाय याची सगळ्यांना कल्पना आहे. आता ज्या बापाचं नावदेखील एका परीघाबाहेर कुणाला माहित नव्हतं त्यावेळी आधार दिलेल्या मुलालाच बाप पोकल बांबूचे फटके देत असेल तर कुणाकडे बघायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल हे ही स्वाभाविकच आहे.
पण, काळजीचं कारण नाही!
बापानं मुलासाठी अंगाई गीत म्हणण्याचे दिवस मागे पडलेत, आता मुलानं बापाची ‘गाई’गीताची आवड ओळखली पाहिजे.
नाट्यपरिषदा, साहित्य संमेलनं, संगीताच्या मैफिली, गुणीजनांचे सत्कार आणि नववर्षाच्या स्वागताची संचलनं बंद केली पाहिजेत. त्याला बापाच्या लेखी काही किंमत नाहीये. तर सत्तेच्या चाव्या हातात असलेल्या परंतु त्या फक्त नमामि गंगेसारख्या कार्यक्रमासाठीच वापरायला उत्सुक असलेला बाप शुद्धी कुणाची करतो हे डोंबिवलीकरांनो जरा ध्यानात घ्या…
बापाला पाठिंब्याची गरज असली की हजारो कोटींची पॅकेजांची आश्वासनं तो तोंडावर फेकतो आणि गरज संपल्यानंतर मधल्या पाच वर्षांत, तुम्ही पाय चेपत असताना घाणेरडा तू असं झिडकारतो. तुमची पूर्वपुण्याई आठवून बाप तुम्हाला चॉकलेट देईल अशा भ्रमात राहू नका, कारण आता बापाला 25 – 27 ठिकाणी दत्तक घेण्यात आलंय, तुमच्यावाचून त्याचं काही अडत नाहीये हे समजून घ्या.
तर, बदललेली परिस्थिती ओळखा… बापाचा स्वभाव, त्याचे संस्कार, त्याचा अहंकार, त्याच्या नाजूक जागा यांचाही नीट अभ्यास करा. आपला बाप दाखवण्यापुरता का होईना सनातनी आहे हे विसरू नका. तो स्वत: हवाबंद बाटलीतून पाणी पित असला तरी,
गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति,
नर्मदे सिंधु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु
हे शब्द कानावर पडले की एकदम गहिवरतो हे लक्षात घ्या.
एकदा हे तुम्हाला नीट समजलं ना डोंबिवलीकरांनो की मग त्याप्रमाणे धोरणीपणानं वागा. मग हाच घाणेरडे म्हणून झिडकारणारा बाप तुम्हाला कडेवर घेऊन मुका घेतो की नाही बघा! तर, ते सगळे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे बंद करा. घाणेरडया नगरीत सांस्कृतिक कार्यक्रमाचं काय काम? त्यामुळं कल्याण डोंबिवली स्वच्छ कसं करता येईल याच्या मागे लागा…
सगळ्यात आधी काय करा माहित्येय… आशियातली किंवा जगातली म्हणा हवं तर पण सगळ्यात मोठी गोशाला उभारण्याची घोषणा करा. खास देशी गाईंच्या जाती न्यूझीलंड वरून मागवणार आहोत असं ठोकून द्या. गाय जे काही उत्सर्जन व विसर्जन करते त्यापासून विविध खाद्य पदार्थ आणि पित्तापासून ते कर्करोगापर्यंत बरी करणारी औषधं या गोशालेत बनवण्यात येतील… अगदी मूळ पतंजली ऋषींनी सांगितल्याबरहुकूम असं जाहीर करून टाका… असं कसं, असं कसं म्हणून उगाच संकोचू नका.. जरा शिका काहीतरी बापापासून… आधी घोषणा करा…
नंतर… उल्हास गटाराचं, आपलं माफ करा उल्हास नदीचं प्राचीन काळातलं ऐतिहासिक महत्त्व शोधा…एक मीच सांगतो, पुण्यक्षेत्र नासिक वरून प्रभू रामचंद्रांनी दक्षिणेकडे जाताना वाटेत उल्हास नदीवर स्नान केलं होतं असा उल्लेख डोंबली रामायणात आहे. हे बिनधास्त सांगा सगळ्या ठिकाणी. ही काय भानगड आहे याच्या फंदात कुणी पडणार नाही… एखादा जुनाट दगड नदीतीरी गाठा आणि भरपूर शेंदूर फासून त्याचं अर्वाचिनित्व झाकलं गेल्याची खात्री पटली की, हे बघा रामाचं उमटलेलं पाऊल असं पसरवा!
अरे घाबरू नका… आपल्या बापानं नी एकूणच आपल्या आधीच्या पिढ्यांनी केलंय असं…
आपल्या स्वास्थ्यासाठी, आरोग्यासाठी निरामय वातावरणासाठी, रोगांना दूर ठेवण्यासाठी नदी स्वच्छ करतं का कोणी? पण आपल्या प्रात:स्मरणीय पूर्वजांची स्थानं पवित्र ठेवायची असतील तर मात्र नद्या स्वच्छ ठेवाव्या लागतात… म्हटलं ना जरा नाजूक जागा ओळखा बापाच्या!
दुर्योधनाला अभेद्य बनवण्यासाठी गांधारीनं लग्नानंतरच्या आयुष्यात एकदाच डोळ्यावरची पट्टी काढण्याचा सीन आपल्या कल्याणातच घडलाय बरं का? गाजावाजा करून सांगा हे! त्यामुळेच पडघ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नदीला गांधारी व वरच्या पुलाला गांधारी पूल नाव पडलंय. यावरूनच दुर्योधन चालत गेला होता. तत्कालिन कल्याणकरांनी दुर्योधनाला मांडीवरचं वस्त्र न काढण्याचा सल्ला दिला होता. अरे आई असली तरी तू काही आता लहान बाळ नाहीस. तिच्यासमोर स्वार्थासाठी नागवं जाणं बरं नाही.. कल्याणकरानं अशी क्लृप्ती केली नी दुर्योधनाचं भीमाच्या हाती मरण निश्चित केलं. पण या उदार सांस्कृतिक कल्याणकरांनी गांधारीचं, त्या पुण्यश्लोक मातोश्रीचं नाव इथं जतन केलंय, असं सांगता यायला पाहिजे तुम्हाला!
सांगायचं म्हणजे… केवळ दशकानुदशकं सातत्यानं बापाला सत्ता देणं पुरेसं नसतं तर आपली नाळ जाज्वल्य अशा इतिहासाशी जोडता यायला पाहिजे ही मजबुरी लक्षात घ्या!
उल्हास नाल्याचं आपलं परत सॉरी पवित्र उल्हास नदीचं व या क्षेत्राचं महाभारत व रामायणाशी गहिरं नातं एकदा का बापाच्या मनावर ठसलं की मग उल्हास महाआरती हा कार्यक्रम हाती घ्या.
रोज व्यायाम वगैरे करणं ऐच्छिक आहे, परंतु जागतिक योगदिनी सगळ्या मोकळ्या जागांवर… रेतीबंदरं, सुभाष – भागशाळा मैदान, विवेकानंद संस्थेच्या शाळेची पटांगणं या जागी योगासन पर्व घ्या. या दिवशी इतकेजण यायला हवेत की गिनिजमध्येच नाव गेलं पाहिजे. ती बातमी एकदा का आली, की पंतप्रधान ट्विट करून कल्याण डोंबिवलीतल्या सगळ्या महानुभावांना शतश: नमन करतील.
इतकं तुम्ही केलंत ना मग शेवटचा आणि रामबाण कार्यक्रम…
ते म्हणजे महाकुंभ मेळ्याचे आयोजन.
मोगलांच्या आक्रमणात नष्ट झालेल्या उल्लू पुराणात (उल्हासचा संकोच होत हे नाव पडलं असावं असा भाषाशास्त्रज्ञांचा अंदाज आहे.) कल्याण क्षेत्री दर हजार वर्षांनी महाकुंभमेळा भरत असे असा दाखला द्या. नष्ट झालेल्या उल्लू पुराणातला दाखला तुम्हाला कुठे मिळाला असं कुणी विचारणार नाही, काळजी नसावी. समजा एखाद्या पुणेकरानं विचारलंच, तर परशुरामानं 21 वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय कशी काय केली असं विचारा.. पहिल्यांदाच सगळे क्षत्रीय नष्ट झाले तर उरलेल्या 20 वेळा आले कुठून असं विचारा.. मग उल्लू पुराणाच्या सत्यतेच्या फंदात कुणी पडणार नाही. अगदीच कुणी हटून बसलं तर शेवटची प्रत भांडारकर संस्थेवरील हल्ल्यात नष्ट झाली असं द्या ठोकून!
तर ते हजारावं महाकुंभमेळ्याचं वर्ष पुढच्याच साली येतंय आणि त्या तयारीला आम्ही लागलोय अशी आवई उठवा. डोंबिवलीतल्या प्रत्येक इमारतीमधला किमान एकजण विदेशात असतो त्याचा फायदा घ्या. आपल्या विदेशात असलेल्या मुलांना, भावांना, मित्रांना स्काइपवर सांगा, घाणेरड्या डोंबिवलीला स्वच्छ करण्यासाठी हजारेक कोटी पाहिजेत, ते उभे करायला तुमची मदत हवीय, ते लगेच करतील.
इथल्या घाणीला कंटाळूनच तर ते गेलेत विदेशात!
महाकुंभमेळ्याच्या आयोजनाची प्रेस कॉन्फरन्स गणेश मंदीर संस्थानमध्ये नका घेऊ.
या विदेशस्त डोंबिवलीकरांच्या मदतीनं कॅलफोर्निया, लंडन, दुबई, मेलबर्न आणि दिल्लीतलं गुजरात भवन इतक्या ठिकाणाहून एकाचवेळी व्हिडीयो कॉन्फरन्सच्या माध्यमातून महाकुंभमेळ्याची घोषणा करावी. वर सांगितलेला सगळा इतिहास नीट ठसवावा. हे सगळं करताना अजिबात लाज बिज वाटू देऊ नका. पॅकिंग महत्त्वाचं हा माननीय पंतप्रधानांनी दिलेला संदेश आठवा. खोका रिकामा असला तरी चालेल पॅकिंग भारी हवं, इम्प्रेशन चांगलं पडतं!
इथपर्यंत पोचायला काही लाख रुपये लागतील. आयआरबीचे म्हैसकर नक्की देतील, चिंता नको. हळदीकुंकापासून ते लावणीपर्यंतच्या कार्यक्रमांना त्यांनी आर्थिक सहाय्य केलंय, शहराच्या या पुनरुत्थानाच्या कार्यक्रमात ते आपला वाटा देणार नाहीत, हे होणं नाही!
पण एकदा का तुम्ही इथपर्यंत पोचलात ना की कल्याण डोंबिवली स्वच्छ करण्यासाठी पैशाच्या राशी आपला हाच बाप ओतेल. कडेवर घेईल, फडके रोडवर फुगड्या खेळेल. तुम्ही स्वप्नात पण बघितले नसतील इतके लाड होतील तुमचे, Rest Assured!
शेजारच्या शहापूरच्या आदिवासी पाड्यातली मुलं कुपोषित राहतील, परंतु थोर भारतीय संस्कृतीचा गतैतिहासिक वारसा जपणाऱ्या पुण्यश्लोक नगरीच्या स्वच्छतेसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी नुसता जाहीर नाही होणार, मिळेलही नक्की, हे लक्षात घ्या. वानगीदाखल नासिकचा कुंभमेळा आठवा!
गरज पडली तर पुण्यक्षेत्र उल्हास खोरे विकास महामंडळ स्थापन करून कर्जरोख्यांच्या माध्यमातून सरकार दोन चार हजार कोटी उभारेलच. यातले शेकडो कोटी मधल्या मध्ये हडप होतील… होईल काही कंत्राटदारांची स्वप्न’पूर्ती’, पण तिकडे दुर्लक्ष करा कारण ते कंत्राटदार स्थानिकच असतील आणि क्रिकेटच्या स्पर्धा, मेळेबिळे भरवून तो पैसा शहरातच खेळेल.
पण रुपयातले जे काही 15 पैसे झिरपतील तुमच्या पदरात त्यानं तुमची डोंबिवली स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट होईल याबद्दल शंका नसावी. परत तिला घाणेरडी म्हणण्याची कुणाच्या बापाची हिंमत होणार नाही, तुमच्यासुद्धा!
– योगेश मेहेंदळे
yogesh.mehendale@loksatta.com
(केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी डोंबिवलीला घाणेरडं शहर असं नुकतंच म्हटलं. त्या वक्तव्याचा या लेखाशी काही संबंध नाही. आढळल्यास योगायोग समजावा.)