शुद्ध देशी गाईंची निर्मिती करण्याकरिता विदेशात नव्याने वापरले जाणारे भ्रूण प्रत्यारोपणाचे (एम्ब्रिओ ट्रान्स्फर) हे तंत्र आता वापरले जाणार आहे. त्यामुळे भारतीय गोवंशाच्या आनुवंशिक सुधारणेत मोठी क्रांती भविष्यात होऊन चांगल्या प्रतीचे दूध ग्राहकांना मिळू शकेल.
रामदेवबाबा यांचा पतंजली उद्योगसमूह व उद्योगपती विजयपत सिंघानिया यांच्या जे.के. ट्रस्टने देशी गाईमध्ये विदेशी तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रयोगशाळेतून थेट गोठय़ापर्यंत ते पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. भ्रूण प्रत्यारोपण किंवा प्रयोगशाळेतील गर्भधारणा (आयव्हीएफ) याचा वापर अमेरिका, इस्रायल व ब्राझिलसारख्या देशांत केले जाते. प्रयोगशाळा, कुशल मनुष्यबळ यावर कोटय़वधी रुपये खर्च येतो. तंत्रज्ञान महागडे असले तरी शुद्ध गीर, थारपारकर, कांकरेज आदी गाईंची निर्मिती या महागडय़ा पद्धतीनेच होऊ शकेल.
भ्रूण प्रत्यारोपणाचे फायदे
स्वातंत्र्यापूर्वी देशातून शुद्ध गीर गाई विदेशात नेण्यात आल्या. याच गाई ब्राझिलमध्ये एका वेतात ४० ते ५० हजार लिटर दूध देतात; पण आपल्या गीर गाई दोन ते अडीच हजार लिटर दूध देतात. त्यात आनुवंशिक सुधारणा केल्याने अधिक दूध मिळू शकेल. कमी कालावधीत देशी गाईंची घरवापसी करून गावरान दुधाची बाजारपेठ विकसित करता येईल.
तंत्रज्ञानाचे तोटे
हे तंत्रज्ञान महागडे आहे. दाता व सरोगेट गाईला फॉलिकन सिम्युलेटिंग हार्मोन टोचावे लागते. ते विदेशातून आयात करावे लागते. ते महागडे आहे. एका गाईच्या गर्भधारणेसाठी वीस ते पंचवीस हजारांचा खर्च येतो. मात्र कृत्रिम गर्भधारणा पद्धतीने तो अवघा एक हजार येतो. बाजारात ४० ते ५० हजाराला एक गाय मिळते. कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे, भ्रूण प्रत्यारोपणानंतर समस्या उद्भवू शकतात.
काय आहे तंत्रज्ञान?
डुकराच्या मेंदुतून काढलेले हार्मोन्सचे इंजेक्शन हे देशी गायीला टोचले की, सात आठ दिवसांत त्यांच्या गर्भाशयातील ग्रंथीवर अंडबीज तयार होतात. कृत्रिम रेतन पध्दतीने त्यात शुध्द देशी गायीच्या वळुचे विर्य सोडले जाते. त्यानंतर गर्भाशयाच्या त्री बीजवाहक नलिकेत बीजे तयार होतात. सात ते आठ दिवसांत विशिष्ट नळी टाकून ते बाहेर काढून प्रयोगशाळेत एका द्रावणात टाकतात. सुश्मदर्शक यंत्राखाली त्यांना बघुन चाळणी व निवड केली जाते. सात दिवसांचे भ्रुण प्रयोगशाळेत तयार झाल्यानंतर ते दुसर्या गायीच्या (सरोगेट गाय) गर्भाशयात सोडून प्रत्यारोपण केले जाते. या गायीचा ऋतुकालही सात आठ दिवस हार्मोन्सचे इंजेक्शन देवून नियमीत केलेला असतो. जन्माला आलेल्या वासरामध्ये सरोगेट गायीचे गुणधर्म उतरत नाही.
गर्भ प्रत्यारोपणाचे तंत्रज्ञान महाग आहे. अजूनही देशात शुद्ध देशी गाई आहेत. कृत्रिम रेतन पद्धतीचा वापर करून आनुवंशिक सुधार घडविता येतो. आता विदेशात वीर्य निवड (सिमेन सेपरेशन) हे तंत्र आले असून ते तुलनेत स्वस्त आहे. त्या माध्यमातून शुद्ध देशी गाईंची निर्मिती करावी. – प्रा. डॉ. सुनील सहातपुरे प्रमुख पशू प्रजननशास्त्र विभाग, पशू वैद्यकीय महाविद्यालय नागपूर</strong>
देशात गीर, कांकरेज, थारपारक, गवळावू, देवणी, लालकंधारी, डांगी, खिल्लार अशा विविध भागांत देशी गाई आहेत. गावठी गाईंची संख्या लाखाने आहे. भ्रूण प्रत्यारोपण करताना जैवविविधता जपली पाहिजे. या तंत्रात सरोगेट गाय ही गावठी वापरावी. हे तंत्र वापरले जात असल्याने त्याचे नियम सरकारने त्वरित तयार करावे. देशातील गोपालनाला धोके होणार नाही, अशा तपासण्या करण्याचा नियमात अंतर्भाव असावा. – डॉ. सारिकुट लांडगे, पशुवैद्यकशास्त्रतज्ज्ञ