सोलापूर : स्थानिक भाजपअंतर्गत संघर्षामुळे गाजलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजय देशमुख या दोन्ही नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. तर त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनेलने निर्विवाद वर्चस्व राखले आहे.
एकूण १८ जागांपैकी १४ जागा कल्याणशेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनेलने जिंकल्या. त्यांच्या पॅनेलला काँग्रेसच्या काही नेत्यांचे सहकार्य मिळाले होते. तर आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनेलला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. यात सहकारी संस्था गटावर कल्याणशेट्टी यांच्या पॅनेलने सर्व ११ जागा जिंकून बाजी मारली. तर दोन्ही देशमुख पॅनेलने ग्रामपंचायत गटात वर्चस्व मिळविले. व्यापारी गटातील दोनपैकी एक जागा याच पॅनेलने जिंकली. बहुमत मिळविलेल्या कल्याणशेट्टी यांच्या पॅनेलकडून निवडून आलेल्यांमध्ये माजी आमदार दिलीप माने, राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे यांच्यासह इंदुमती अलगोंड, श्रीशैल नरोळे आदींचा समावेश आहे.
ग्रामपंचायत गटातील चार जागांची मतमोजणी झाली असता त्यात देशमुख पॅनेलने आघाडी घेतली. यात आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख व रामप्पा चंद्रशेखर चिवडशेट्टी (६१५, होटगी, ता. दक्षिण सोलापूर) हे खुल्या गटातून निवडून आले. तसेच ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती गटातून अतुल हरी गायकवाड (होटगी) हे विजयी झाले. आर्थिक दुर्बल घटक गटात कल्याणशेट्टी यांच्या पॅनेलचे ब्रह्मानंद कळके (मुस्ती, ता. द. सोलापूर) यांनी बाजी मारली.
कल्याणशेट्टी पॅनेलने सहकारी संस्था गटातील सर्व ११ जागा जिंकून देशमुख पॅनेलचा धुव्वा उडविला. राजशेखर शिवदारे, दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्यासह उदय उर्फ रेवणसिद्ध चंद्रकांत पाटील, नागप्पा म्हाळप्पा बनसोडे, प्रथमेश वसंत पाटील आणि श्रीशैल बसवेश्वर नरोळे यांनी विजय संपादन केला. तर सहकारी संस्था महिला गटातून इंदुमती परमानंद अलगोंड आणि अनिता केदार विभुते यांनी बाजी मारली. याशिवाय सहकारी संस्था ओबीसी गटात अविनाश श्रीधर मार्तंडे तर विमुक्त जाती व भटक्या जमाती गटात सुभाष रामचंद्र पाटोळे हे निवडून आले. व्यापारी गटात देशमुख पॅनेलचे वैभव चंद्रशेखर बरबडे तर कल्याणशेट्टी-माने पॅनेलचे मुश्ताक अहमद चौधरी यांनी विजय मिळविला. हमाल-तोलार गटातून कल्याणशेट्टी-माने पॅनेलचे गफ्फार जब्बार चांदा हे विजयी झाले.