पंढरपूर : चैत्री यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले तसेच सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले. मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, पूजा, फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून २ कोटी ५६ लाखांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. गेल्या वर्षीच्या चैत्री यात्रेच्या तुलनेत या दानामध्ये यंदा १ कोटी ३० लाख रुपयांची वाढ झाली आहे.
येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला दान देणाऱ्यांचे हात वाढले आहेत. दानशूर व्यक्ती हे सोने, चांदी, दागिने यांसह विविध स्वरूपात दान देणारे पुढे येत आहेत. प्रमुख यात्रेमध्ये विविध माध्यमातून समितीच्या उत्पन्नात वाढ होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या उत्पन्नाचा आलेख चढता राहिला आहे.
मंदिर समितीला ३० मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ २५५९०९२ रुपये अर्पण केले. तर ६३९९७७९ रुपयांची देणगी समितीला प्राप्त झाली आहे. लाडू प्रसाद विक्रीतून २६२१००० रुपये, ३४३४७०८ रुपये भक्तनिवास, पूजेच्या माध्यमातून २९२२१०० रुपये तर ६४८५२०४ रुपये हुंडीपेटी, १६३७७४ रुपये सोने-चांदी अर्पण तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमूत्र, मोबाइल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून १०६८३९८ रुपये असे एकूण २५६५५०५५ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. तर मागील वर्षी २६१०३९६ रुपये देणगी, लाडूप्रसाद विक्रीतून १९०६०००, भक्तनिवास ७५२२९८ रुपये, २१००० रुपये पूजेच्या माध्यमातून, ४६८४१२४ रुपये हुंडीपेटीतून, ८९२५९ रुपयाचे सोने-चांदीचे दागिणे अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमूत्र, मोबाइल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून २६१०७११ रुपये प्राप्त झाले होते, असे एकूण गेल्या वर्षी १२६७३७८८ रुपये उत्पन्न मिळाले होते.
गेल्या वर्षीच्या चैत्री यात्रेत १ कोटी २६ लाख ७३ हजार ७८८ रुपये उत्पन्न विविध माध्यमातून मिळाले होते. तर यंदाच्या चैत्री यात्रेत समितीला विविध माध्यमातून २ कोटी ५६ लाख ५५ हजार ५५ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ कोटी २९ लाख ८१ हजार २६७ रुपये उत्पन्नात वाढ झाली आहे. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, असे श्रोत्री यांनी सांगितले. तथापि, मागील वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुरातत्त्व विभागाच्या वतीने मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी विठ्ठलाच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू होते. त्यामुळे यात्रेत भाविकांना मुखदर्शन फक्त घेता आले. १५ ते २१ एप्रिल या चैत्री यात्रा कालावधीत पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. यंदा मात्र यात्रा कालावधीत पदस्पर्श म्हणजे देवाच्या पायावर डोके ठेवून आणि मुखदर्शन सुरू होते. असे असले तरी दान देताना भाविकांनी मुक्तहस्ताने दान दिले.