कराड: कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे १५ ते १७ एप्रिल या कालावधीत दौलतनगर मरळी (ता. पाटण) येथे आयोजन करण्यात आले आहे. ही अभिनव संकल्पना राबवताना राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी या महोत्सवाच्या उद्घाटनाचा सन्मान शेतकऱ्यांना दिला. पाच शेतकऱ्यांनी सपत्नीक डोंगरी महोत्सवाचे उद्घाटन केले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देसाई म्हणाले, कोयना दौलत डोंगरी महोत्सवात उपलब्ध करुन देण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा महिला बचत गटांच्या महिलांनी लाभ घ्यावा. ज्या बाबी केवळ आपण मोठ्या शहरांमध्ये पाहत आलो आहोत. त्या सर्व या महोत्सवानिमित्ताने आपण डोंगरी भागातील लोकांना अत्यंत अल्प शुल्कात उपलब्ध करुन दिल्या आहेत. अत्यंत चांगले कृषी प्रदर्शन आयोजिले आहे. महिला बचत गटांनी उत्पादित मालाला बाजारपेठ देण्याच्या दृष्टीने आपण पाचगणी येथे सातारा जिल्ह्यातील पहिला मोठा बझार (मॉल) उभा करत आहोत. या ठिकाणी परदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. याचा आदर्श घेऊन सर्व जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालासाठी मोठा बझार (मॉल) उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. याची सुरुवात सातारा जिल्ह्यातून आपण पहिल्यांदा केली याचा मनस्वी आनंद आहे. महिला अत्यंत सृजनशील असतात त्यांच्या सर्व नावीन्यपूर्ण कल्पनांना माझा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पाठिंबा राहील, अशी ग्वाहीही शंभूराज देसाई यांनी दिली.
महोत्सवात काय ?
कोयना दौलत डोंगरी महोत्सवात महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडीची प्रतिकृती, महात्मा गांधी रोजगारहमी योजनेंतर्गत बांबू लागवड, ऊस पाचट व्यवस्थापन, अन्न- पौष्टिक तृणधान्य महत्व, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, महाडिबीटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना, राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय व्यवस्थापक, पर्यटन संचालनालय, कृषी विज्ञान केंद्र, अन्न प्रक्रिया उद्योग, मत्स्य पालन, भात उत्पादन, खादी ग्रामोद्योग, रेशीम शेती, एकात्मिक कीड व्यवस्थापन यासह अनेक शेतकऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या दालनांची उभारणी महोत्सावत करण्यात आली आहे. या दालनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी प्रगत शेती कशी करावी या विषयी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तसेच कृषी औजारे, कृषी संलग्न वाहने, बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री व्हावी यासाठी या महोत्सवात दालने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.