भारतीय जनता पार्टीने अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवू नये. सहानुभूतीचा विचार करून येथे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडून कशा येतील? याचा विचार करावा, अशा आशयाचं पत्र राज ठाकरेंनी लिहिलं आहे. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर भारतीय जनता पार्टीकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत भारतीय जनता पार्टीने काय निर्णय घ्यावा, हे पक्षाचं नेतृत्व ठरवेल, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एबीपी माझा’शी फोनवरून संवाद साधताना प्रसाद लाड म्हणाले, “आम्ही राज ठाकरे यांचा आदर करतो. राज ठाकरेंचं मत हे त्यांचं वैयक्तिक किंवा त्यांच्या पक्षाचं मत असू शकतं. भारतीय जनता पार्टीने कोणता निर्णय घ्यावा? यावर पक्षाचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार निर्णय घेतील. त्यांनी कोणत्या भावनेतून पत्र लिहिलंय? याची आम्हाला माहिती नाही. या विषयावर काहीही चर्चा झाली नाही. तरीदेखील याचा सर्वतोपरी निर्णय पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचे नेते घेतील, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली आहे.

प्रसाद लाड यांनी यावेळी ठाकरे गटाचे शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले, “अरविंद सावंत आणि त्यांच्या पक्षनेतृत्वाला सहानुभूतीवर जगण्याची सवय पडली आहे. उद्धव ठाकरेंनी आयुष्यभर सहानुभूतीचंच राजकारण केलं. सरकार चालवतानाही त्यांनी सहानुभूती दाखवली. करोनामध्येही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. सहानुभूतीच्या नादात उद्धव ठाकरेंनी खड्ड्यात जाण्याचं काम केलं आहे. आता अरविंद सावंतांनाही त्यांच्या सहानुभूतीची सवय लागली आहे.”

हेही वाचा- मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका, राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, म्हणाले “रमेश लटकेंच्या आत्म्याला….”

निश्चितपणे कुणाच्या घरात मयत झाली असेल तर याबाबत आम्हाला सहानुभूती आहे. पण अरविंद सावंतांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. एखादी निवडणूक लढवू नका किंवा तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, अशी मागणी करायला त्यांचे कोणते नेते आमच्याकडे आले होते का? उद्धव ठाकरेंनी याबाबत देवेंद्र फडणवीसांकडे विनंती केली होती का? आपण केवळ अहंकारात जगायचं, ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची सवय आहे. त्यांनी आधी आपल्या नेत्यांची सवय बदलली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे, असंही प्रसाद लाड यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont contest andheri bypoll raj thackeray letter to devendra fadnavis prasad lad reaction rmm
Show comments