Nitin Gadkari in Nagpur : आमदार आणि त्यांच्या लोकांना सरसकट शाळा, आश्रम शाळा आणि कॉलेजं वाटू नका. आश्रम शाळांचं रेटिंग ठरवा, चांगल्या शाळांना प्रोत्साहन द्या आणि वाईट शाळांना यंत्रणेतून बाहेर काढा असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदारांना दिला. ते नागपुरातील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस समारंभ कार्क्रमात ते बोलत होत.
नितीन गडकरी म्हणाले, “आश्रम शाळांचं रेटिंग केलं पाहिजे. ज्यांचं रेटिंग चांगलं आहे, त्यांना स्किल डेव्हलेपमेंटचं ट्रेनिंग देणारं इन्स्टिट्युट सुरू करण्याकरता मदत केली पाहिजे. ओडिसामध्ये अलका मिश्रा नावाच्या मोठ्या अधिकारी होत्या. त्या रेल्वे बोर्डाच्या दोन नंबरच्या अधिकारी होत्या. त्या आता माझ्याबरोबर काम करतात. त्यांनी बडोद्याला एक लॉजिस्टिक युनिव्हर्सिटी सुरू केली. त्यामध्ये वर्ल्ड बँकेच्या सहकाऱ्यांनी स्किल युनिव्हर्सिटी सुरू केली. लाखो लोकांना प्रशिक्षित करणाऱ्या योजना सुरू केल्या.”
“आज जेव्हा विखे माझ्याकडे आले होते. तेव्हा माझ्याकडे चर्मकार समाजाची एक मुलगी आली होती. ती एअर हॉस्टेस म्हणून सिलेक्ट झाली. आपल्याकडे मेघालय, त्रिपुरा भागातील मुली, काही आदिवासी समाजातील आहेत, त्या एअर इंडियामध्ये एअर हॉस्टेस म्हणून काम करतात. लो एम इज क्राइम. येणाऱ्या काळात आपल्या मुला मुलींना उत्तम शिक्षण आणि कौशल्य कसं मिळेल याकरता योजना करण्याची आवश्यक आहे. त्यामुळे सरसकट शाळा, कॉलेज आणि आश्रम शाळा आमदारांना आणि आमदारांबरोबर येणाऱ्यांना लोकांना वाटू नका. मी ही माझ्या काळात पालकमंत्री असताना वाटल्या. मी त्यांना सांगितलं की इमानदारीने काम करा. मुलांना चांगलं शिक्षण द्या, अन्न द्या. त्यांना त्यांच्या पायांवर उभं करा, मग दोन पैसे तुम्ही कमवा. पण तुम्ही सर्वच पैसे आपल्या पोटात घालाल आणि आदिवासी विकासाच्या गप्पा माराल तर असं नाही जमणार”, असं नितीन गडकरी म्हणाले.
“ज्यांचं रेटिंग चांगलं आहे, स्पर्धा असली पाहिजे. मंत्र्याच्या शिफारशीने सिलेक्ट नका करू. रेटिंग चांगली असेल तर त्यांना प्रोत्साहन द्या आणि रेटिंग खराब असेल तर त्यांना यंत्रणांच्या बाहेर काढा. यामुळे गुणवत्ता सुधारेल. गुणवत्ता सुधारली तर तुमच्यातून चांगले नागरिक, खेळाडू आणि संशोधक तयार होतील”, असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
E