शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार देतानाच त्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरूवारी दिलासा दिला. पण, शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी सरकारला जावेच लागेल, असं म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“सर्वोच्च न्यायालयाचा लढा, जवळजवळ अंतिम टप्प्यात आला आहे. सरकारचे तीन महिने बाकी आहेत. या सरकारला जावच लागेल. घटनाबाह्य सरकार वाचवण्याचं कोणी कितीही प्रयत्न केले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत येतील. पंतप्रधान बेकायदेशीर काम करतात का? त्यांच्या डोळ्यांसमोर बेकायदेशीर कृत्य घडत आहे,” असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे.
हेही वाचा : “९० दिवसांत आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय नाही घेतला, तर…”, संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना इशारा
“सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला आहे. पंतप्रधान हे डोळं उघडे ठेऊन बघत बसले, तर जगाला काय तोंड देणार? लोकशाही, घटनेचे संरक्षणकर्ते म्हणून जगात कोणत्या तोंडाने फिरणार?,” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या तोंडी नैतिकतेसारखे शब्द शोभत नाहीत, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. याबद्दल विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “राजकारणातून नैतिकता नष्ट झाली आहे. संस्कार आणि संस्कृती २०१४ पासून महाराष्ट्र आणि देशातील नष्ट झाले आहे. या नैतिकतेचे मारेकरी भाजपाचे लोक आहेत. अशावेळी उद्धव ठाकरेंसारखा नेता, नैतिकतेने त्याग करतो, याचा गौरव व्हायला पाहिजे. तसेच, ज्यांनी प्रश्न विचारला आहे, त्यांनी निर्माण केलेल्या अनैतिकतेच्या चिखलात डुकरासारखं लोळत पडावे,” असा टोला संजय राऊतांनी बावनकुळेंना लगावला आहे.
हेही वाचा : शरद पवारांसमोर ढसाढसा रडत सुषमा अंधारेंकडून तक्रार, अजित पवार म्हणाले, “काका रे…”
बाळासाहेब ठाकरे हे लढणार, तर उद्धव ठाकरे हे रडणारे नेते आहेत, असेही बावनकुळेंनी म्हटलं. याबाबत विचारल्यावर संजय राऊतांनी सांगितलं, “त्यांना बाळासाहेब ठाकरे काय माहिती आहेत. त्यांनी कधी बाळासाहेब ठाकरेंना पाहिलं आहे का?,” असा सवाल संजय राऊतांनी बावनकुळेंना विचारला आहे.