राज्यात दोन वेगवेगळ्या तारखांना शिवजयंती साजरी न करता ती एकाच दिवशी साजरी करण्यात यावी अशी मागणी आता शिवसेना आमदारांनी ठाकरे सरकारकडे केली आहे. तिथीनुसार शिवजयंती साजरी न करता ती तारखेनुसारच साजरी केली जावी अशी भूमिका शिवसेना आमदार अंबादास दानवे आणि संजय शिरसाट यांनी मांडली आहे. तारखेनुसार १९ फेब्रुवारी या दिवशीच एकदाच शिवजयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी सरकारकडे करणार असल्याची माहिती शिवसेना आमदारांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“दरवेळी शिवजयंती साजरी होताना काही पक्षांची आणि शिवप्रेमी संघटनांची मागणी होती की शिवजयंती एकाच दिवशी साजरी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात जल्लोष करता येतो. पण दोनदा साजरी केल्यामुळे त्यामध्ये अडथळे येतात. कोणताही एक दिवस हा सरकारने निश्चित केला पाहिजे. दोन शिवजयंती या महाराष्ट्रात नको ही आम्ही सर्वांची भूमिका आहे आणि ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत,” अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिली.

“शिवाजी महाराजांची जयंती वेगवेगळ्या ठिकाणी तारखेनुसार आणि तिथीनुसार केली जाते. आधीच्या काळी तिथीनुसार होत होती आणि आता तारखेनुसार होणाऱ्या जयंतीमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या वेळी शिवजयंती साजरी का होत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी सरकारकडे करु,” अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली.

दरम्यान, या मागणी नंतर राज्यभरात शिवसेनेच्या या भूमिकेबाबत चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका ही शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी व्हावी अशी होती. त्यानुसार राज्यात शिवसेनेकडून तिथीनुसारच शिवजयंती साजरी करण्यात येत होती. गेल्या काही वर्षापासून तारखेनुसारच शिवजयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी समोर येत होती. त्यानंतर आता शिवसेना आमदारांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्याकडे तारखेनुसारच शिवजयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून तिथीनुसार साजरी करण्यात येणारी शिवजयंती बंद करुन तारखेनुसार साजरी करण्याची मागणी मुख्यमंत्री मान्य करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont want two shiv jayanti in maharashtra demand of shiv sena mlas to the cm uddhav thackeray abn