महाविकास आघाडीचे सरकार असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( एमपीएससी ) परिक्षा पुढे ढकलण्यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यात आंदोलन केलं होतं. त्याच गोपीचंद पडळकर यांनी आता ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिला आहे. ‘एमपीएससी’त नाही उत्तीर्ण झाला तर गावाकडे सरपंचाचे पद तुमची वाट बगत आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
आमदार पडळकर यांनी पुण्यात ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तेव्हा पडळकर यांनी विद्यार्थ्यांना हा सल्ला दिला आहे. “एमपीएससी नाही झाला तर गावाकडे पंचायत समितीच्या सदस्यपदाची जागा वाट पाहत आहे. तुम्हाला सभापती होता येईल. ‘एमपीएससी’ नाही झाला तर चिंता करू नका, झेडपी मेंबर किवां आमदार खासदार होता येईल,” असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.
हेही वाचा : “पाच कोटी मोजायला गेले होते का?” चंद्रकांत खैरेंच्या आरोपाला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर
“पण, राजकारण मोठी स्पर्धा आहे. जो तो म्हणतो ‘एमपीएससी’त स्पर्धा आहे. ‘एमपीएसीत’ २१ लाख मुले आहेत. पण, १२ कोटी जनेतेतून फक्त २८८ आमदार विधानसभेत आहेत. ही किती मोठी स्पर्धा आहे. निवडणुकीत पडला म्हणून आत्महत्या केली, असं तुम्ही ऐकलं का? मंत्रीपदाच्या यादीत नाव न आल्याने आत्महत्या केल्याचं ऐकलं का? त्यांना निराशा आली नसेल का? निराशा सर्वांना असते. १०० आणि ११ मतांनी आमदार पडले आहेत. तरीसुद्धा ते आठव्या दिवशी लोकांत जातात,” असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.