उसनवारीतील पैशांच्या वादातून दोन तरूणांनी एकमेकांना भोसकल्याने दोघेही गतप्राण झाले. दुहेरी हत्याकांडाची ही घटना कळंब येथील प्रेमनगरात आज बुधवारी पहाटे घडली. विश्वजीत प्रकाश बुरबुरे (३०), रा. तिरझडा, ता. कळंब  आणि वैभव उर्फ डोमा लक्ष्मण राऊत (२७) रा. बाभूळगाव हल्ली मुक्काम कळंब जि. यवतमाळ अशी मृतांची नावे आहेत.

मृत वैभव उर्फ डोमा राऊत हा कळंब येथील बाभूळगाव मार्गावरील माथा भागात राहणाऱ्या आशिष् गायकवाड यांच्याकडे काम करायचा व राहायचा. आशिष गायकवाड यांनी विश्वजीत बुरबुरे याला ३० हजार रूपये उसनवारीने दिले होते. पैसे वसुलीचे काम डोमा राऊत करायचा. त्याने विश्वजीतकडेही काही दिवसांपासून पैशांसाठी तगादा लावला होता. हाच राग मनात धरून विश्वजीत धारदार शस्त्र घेऊन आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास गायकवाड याच्या घरी पोहचला. वऱ्हांड्यात झोपून असलेल्या वैभवर त्याने शस्त्राने वार केले. या झटापटीत वैभवने विश्वजीतच्या हातातील धारदार शस्त्र हिसकावून त्याच्यावर पलटवार केला. त्यात विश्वजीत जागेवरच ठार झाला. दरम्यान वैभव राऊत याला गंभीर अवस्थेत यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ‘आशीष गायकवाड याने व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्याच्या वादातून विश्वजीतने वैभवर हल्ला केला. त्यांच्यात झटापटी होऊन एकाच शस्त्राने दोघांनीही एकमेकांवर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. दोघांचीही कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. पोलीस अधिक तपास करीत आहे’, अशी माहिती कळंबचे ठाणेदार विजय राठोड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. या घटनेने कळंब शहर हादरले असून नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.