लोकसभेची निवडणूक होताच कर्जत शहरासह तालुक्यात पुन्हा काटेकोरपणे वीजकपात सुरू झाली आहे. उन्हाची काहिली वाढलेली असतानाच या वीजकपातीने जनता हैराण झाली आहे.
कर्जत शहरात सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवार या चार दिवशी पहाटे ५.३० ते सकाळी ८.३० व मंगळवार, गुरुवार, शनिवार सकाळी १० ते दुपारी १.३० पर्यंत व दररोज सायंकाळी ५.३० ते ८.३० अशी रोज सात तास वीजकपात करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत केवळ साडेतीन तासांची वीजकपात सुरू होती, ती आता दुप्पट करण्यात आली आहे. केवळ निवडणुकीसाठीच ही व्यवस्था करण्यात आली असण्याची शंका लोकांमध्ये व्यक होत आहे, मात्र स्थानिक अधिकारी केवळ वरून आदेश आले आहेत, एवढेच सांगतात.
कर्जत शहरात वसुली चांगली असूनही शहराचा समावेश थेट शेवटच्या एफ गटात करण्यात आला आहे. होणारा वीजपुरवठा व येणारे पैसे याचा मेळ घालून वीजकपातीचा गट ठरविण्यात येतो. यामध्ये वीजगळती मोठय़ा प्रमाणात आहे, त्याचा अधिभार नागरिक भरत असतानाच शंभर टक्के वसुलीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सततच्या वीजकपातीने विजेवर सर्व अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे.