औरंगाबाद – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त औरंगाबाद शहरात आज सकाळपासून ‘जय भीम’चा गजर होता. शहरातील भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शहरातील नामवंतांनी हजेरी लावली. सर्वसामान्य जनता अभिवादनासाठी सकाळपासून विद्यापीठ परिसरात जमली होती. एका बाजूला उत्साह आणि दुसऱ्या बाजूला वैचारिक व्याख्यानांचे आयोजन शहरात वेगवेगळ्या संस्थांनी आयोजित केले. विद्यापीठात प्रा. हरी नरके यांचे व्याख्यान झाले, तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीनेही ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत राजा ढाले यांना समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. जयंती मोठय़ा प्रमाणात साजरी करण्यात आली. शहरातील क्रांती चौकात वेगवेगळ्या मंडळांनी जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन केले. सायंकाळी सर्वसामान्य माणसांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येकजण मिरवणुकीत सहभागी झाला.
परभणी- परभणी शहरात जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आंबेडकरी अनुयायांनी अतिशय उत्साहात व आनंदात जयंती उत्सवाच्या मिरवणुकीत सहभाग नोंदवला. यावेळी दुचाकी फेरी काढण्यात आली. सर्वधर्मीय फुले-शाहू-आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने एका देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळपासूनच अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने भीमगौरव मोटारसायकल रॅलीचे आयोजन सुधीर साळवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या रॅलीतही तरुणांनी मोठा सहभाग नोंदवला. हिंगोली- िहगोलीतील पुतळा समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या हस्ते धार्मिक पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. रामलाला मदानावरील आंबेडकर भवन येथे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण तर माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते मोटारसायकल रॅलीला झेंडी दाखवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शहराच्या प्रमुख भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करीत काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीत युवक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
बीड- बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसनिकांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. नांदेड, लातूर, जालना येथेही मोठय़ा उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
मराठवाडय़ात उसळला भीमसागर!
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त औरंगाबाद शहरात आज सकाळपासून ‘जय भीम’चा गजर होता.
First published on: 15-04-2015 at 01:57 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr ambedkar birth anniversary celebrate