भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी दमदाटी करीत जबरदस्तीने वर्गणी मागून शहरातील व्यापारी तथा व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या तीन मंडळांच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. वर्गणीच्या नावाखाली गुंडगिरी व खंडणी मागण्याचे प्रकार वाढत चालल्यामुळे व्यापारी वर्गात चिंता व्यक्त होत आहे.
हैदराबाद महामार्गावर सिध्देश्वर मार्केट यार्डात संतोष गुरूबसप्पा अंगद यांच्या नागनाथ हॉटेलमध्ये दयानंद महाविद्यालयाजवळील ब्ल्यू हार्ट मंडळाच्या कार्यकर्त्यांनी येऊन डॉ. आंबेडकर जयंती उत्सवासाठी एक हजाराची वर्गणी मागितली व जबरदस्तीने पावती फाडून हॉटेलच्या काऊंटरवर ठेवली. एवढी वर्गणी देऊ शकत नसल्याचे हॉटेलमालक अंकद यांनी सांगताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत शिवीगाळ व दमदाटी केली. एका कार्यकर्त्यांने हॉटेलच्या काऊंटरवरील चॉकलेटची बरणी उचलून अंगद यांच्या तोंडावर फेकून मारली. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.
अशोक चौकातील राजेंद्र गृह भांडार नावाच्या दुकानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची वर्गणी मागण्याच्या कारणावरून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून दुकानदार राजेंद्र चंद्रय्या बत्तूल यांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. दुकानात गि-हाईक असल्यामुळे वर्गणीसाठी नंतर या, असे दुकानदाराने सांगितल्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना राग आला व त्यांनी आताच वर्गणी दे म्हणून गोंधळ घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात बापूजी नगर परिसरातील श्रीनिवास भंडारे व इतरांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. वर्गणीवरून व्यापाऱ्यास दमदाटी करून खंडणी मागण्याचा तिसरा प्रकार अक्कलकोट रस्त्यावरील संगमेश्वर नगरात घडला. तेथील सह्य़ाद्री बिअर शॉपीत विष्णू सकट (रा. मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड), पप्पू मोरे, सुनील कांबळे (रा. संगमेश्वर नगर) आदींनी येऊन डॉ.आंबेडकर जयंतीसाठी पाच हजारांची वर्गणी मागितली. परंतु एवढी मोठी वर्गणी देण्यास तयार नसल्याचे दुकानमालकाने सांगताच रागावलेल्या कार्यकर्त्यांनी बिअर शॉपीची तोडफोड केली. त्यांच्या हल्ल्यात रामलिंग महालिंग म्हेत्रे (३५) हे जखमी झाले. याप्रकरणी सहा जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

Story img Loader