अकोले: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ८४ वर्षांपूर्वीच्या कोतूळ भेटीतील ‘पदस्पर्श भूमी’ सोहळ्याच्या आठवणींना, त्यांचे नातू प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत उजाळा दिला. लोकांच्या उत्साहामुळे हा सोहळा विशेष ठरला. प्रकाश आंबेडकर यांचे कोतूळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
दि. २७ एप्रिल १९४१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोतूळला भेट दिली होती. कोतूळमध्ये त्यांनी महिला परिषदेला संबोधित केले. यावेळी डॉ बाबासाहेबांच्या काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सर्व जातीधर्माचे लोक सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब नंतर भाऊ दाजी देशमुख यांच्या वाड्यावर गेले. तेथे देशमुख कुटुंबीयांनी त्यांचे आदरातिथ्य केले. त्यांना औक्षण केले. यावेळी सहभोजनही आयोजित करण्यात आले होते. त्यावेळची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता या गोष्टीचे महत्त्व लक्षात येते.या घटनेची आठवण म्हणून पदस्पर्श दिन साजरा केला जातो. या वर्षीचा पदस्पर्श भूमी सोहळा प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमुळे ऐतिहासिक ठरला. ८४ वर्षांपूर्वी देशमुखांच्या वाड्यातील ज्या चौपाळ्यावर डॉ. बाबासाहेब बसले, त्याच चौपाळ्यावर त्यांचे नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना बसवून देशमुख कुटुंबीयांनी त्यांचा सन्मान करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या सोहळ्याच्या निमित्ताने शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नंतर अभिवादन सभा झाली. अध्यक्षस्थानी संघराज रुपवते होते. आमदार डॉ. किरण लहामटे, सोहळ्याच्या स्वागताध्यक्षा उत्कर्षा रुपवते, विजय वाकचौरे, रवींद्र देशमुख, राजेंद्र देशमुख उपस्थित होते.
मोठी लोकसंख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे तंत्रज्ञान आणि व्यवस्था निर्माण केली तरच बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकेल, असे ते म्हणाले. सरकारी शिक्षण व्यवस्थेत शिक्षण घेऊन उच्चपदी पोहचलेले आता खासगीकरणाचे समर्थन करीत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. समाजापुढील आजच्या विविध समस्यांचा त्यांनी भाषणात आढावा घेतला.
विश्रामगृहाचे स्मारक व्हावे
डॉ. बाबासाहेब कोतूळ येथे आले तेव्हा ते ज्या विश्रामगृहावर थांबले होते, त्या विश्रामगृहाची सध्या दुरवस्था झाली आहे. त्याचा जीर्णोद्धार करून तेथे बाबासाहेबांचे स्मारक करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आमदार डॉ. लहामटे यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला. ८४ वर्षांपूर्वीच्या आठवणी जागविणारा हा सोहळा अनेक अर्थाने संस्मरणीय ठरला.