नांदेड : सामुदायिक बुद्धवंदना, अभिवादन सभा, व्याख्यान, १८ तास अभ्यास, प्रतिमापूजन आणि भव्य मिरवणुका…अशा विविध कार्यक्रमांनी सोमवार (दि.१४) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख रस्ते,. चौकात लावलेल्या शेकडो झेंड्यांमुळे वातावरण निळेमय झाले होते. सायंकाळी शहराच्या विविध भागांतिन मिरवणुकांना उत्साहात सुरुवात झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्था-संघटनांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. ठिकठिकाणी आकर्षक रोषणाईने व्यासपीठ सजविण्यात आले. मध्यरात्री रेल्वेस्थानक परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भीमसैनिक उपस्थित होते. रात्री १२ वाजता पुतळ्यासमोर आतिषबाजी करण्यात आली. शहरात जागोजागी कमानी, स्वागतफलक, विद्युत रोषणाई, पताका आणि झेंडे व भीमगीतांच्या सुरांनी वातावरण भारावलेले होते.

शहराच्या वेगवेगळ्या भागात अन्नदान, शीतपेयांचे वाटप झाले. माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, खा. रवींद्र चव्हाण, आ. श्रीजया चव्हाण, आ. बालाजी कल्याणकर, आ. आनंद पाटील तिडके, आ. प्रताप पाटील चिखलीकर, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी आमदार अमर राजूरकर, अॅड. चैतन्यबापू देशमुख, संतुक हंबर्डे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.

सायंकाळी शहराच्या विविध भागांतून मिरवणुका काढण्यात आल्या. त्यामध्ये पुरुषांसह महिला व युवतींनीही तुर्रेदार निळे फेटे घालून सहभाग नोंदवला होता. विविध संकल्पनांवर आधारलेले चित्ररथ, जय भीमचा उल्लेख असणारे टी-शर्ट, रिबिन्स व टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

बॅनरवरून दोन गटात वाद

तामसा (ता.हदगाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे पोस्टर आमच्या दुकानासमोर का लावता, म्हणून दोन गटात वाद झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. नागोराव जाधव यांच्या फिर्यादीवरून तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.