राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांत रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अमोल कोल्हेंनी पुण्यातील पोटनिवडणुकीतही शिट्टी वाजवून चर्चेला तोंड फोडलं होतं. स्टार प्रचारकांमध्ये कोल्हेंचा समावेश न करण्यात आल्यामुळे त्यावरूनही तर्क-वितर्क सुरू झाल्यानंतर आता अमोल कोल्हेंनी जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ट्वीट केलेल्या फोटोंवरून पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. हा फोटो व्हायरल होऊ लागताच खुद्द अमोल कोल्हेंनीच त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
काय होतं अमोल कोल्हे यांचं ट्वीट?
अमोल कोल्हे यांनी जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी अर्थात २३ मार्च रोजी अमोल कोल्हे यांनी एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी त्यांचेच पुस्तक वाचतानाचे दोन फोटो ट्वीट केले होते. “विचारधारा कोणतीही असो, ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरू कोण?” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. शिवाय, “वाचाल तर वाचाल! जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा!” असंही त्यांनी ट्वीटमधील फोटोंवर लिहिलं आहे.
फोटोत नक्की काय?
ज्या फोटोंवरून अमोल कोल्हेंबाबत चर्चा सुरू झाली आहे, त्या दोनपैकी एका फोटोत अमोल कोल्हे शरद पवारांचं नेमकेचि बोलणे हे पुस्तक वाचताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये द न्यू बीजेपी हे पुस्तक ते वाचत आहेत. त्यांच्या भाजपाचं पुस्तक वाचण्याच्या फोटोवरून अनेक तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
“मला फक्त एवढंच सुचवायचं होतं की…”
दरम्यान, या चर्चांवर खुद्द अमोल कोल्हे यांनीच एका कार्यक्रमात बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. “दोन पुस्तकं वाचत असताना मी फोटो टाकले. मी इस्लामपूरमध्ये येताना अनेकांचे मला फोन आले. एक पुस्तक होतं शरद पवारांच्या भाषणांचं ‘नेमकेचि बोलणे’. दुसरं पुस्तक होतं नलिन मेहतांचं ‘द न्यू बीजेपी’. बातम्या लगेच सुरू झाल्या की नक्की अमोल कोल्हेंना सुचवायचंय काय? मला फक्त एवढंच सुचवायचं होतं की विचारधारा कोणतीही असली, तिचा विरोध जरी करायचा असला तरी तिचा आधी अभ्यास करायला लागतो हे जास्त महत्त्वांच आहे. ते तुमच्या वाचनातून येतं”, असं अमोल कोल्हे म्हणाले.