अहिल्यानगर : महापालिकेच्या आरोग्य विभागातील अपहाराच्या गुन्ह्यात अटक झालेले तसेच कामकाजात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून सक्तीच्या रजेवर पाठवलेले आरोग्य विभागप्रमुख तथा वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल अशोक बोरगे यांना आता निलंबित करण्यात आले आहे. मनपा प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी डॉ. बोरगे यांच्या निलंबनाचे आदेश आज, शुक्रवारी काढले.
अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कामकाज राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये राज्यातील सर्व महापालिकांमध्ये अत्यंत निचांकी पातळीवर गेल्याचे आरोग्यसेवा संचालकांनी महापालिकेला कळवले होते. त्यानुसार आयुक्त डांगे यांनी डॉ. बोरगे यांना नोटीस बजावली होती. परंतु कामकाजात सुधारणा न झाल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.
या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात मनपाच्या आरोग्य विभागातील सर्व कामकाजाची तपासणी करण्यासाठी आयुक्त डांगे यांनी त्रिसदस्य समिती नियुक्त केली होती. या समितीने डॉ. बोरगे यांच्यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानचे शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार महादेव रणदिवे यांच्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहारासह विविध आक्षेप नोंदवत ठपका ठेवला होता. या समितीने सादर केलेल्या अहवालात विजयकुमार रणदिवे व डॉ. अनिल बोरगे यांच्याविरुद्ध १६ लाख ५० हजार रुपयांचा अपहर केला तसेच १५ लाखाची रक्कम रणदिवे यांच्या खात्यात जमा केली व पुन्हा पाच लाख, पाच लाख, पाच लाख असे एकूण १५ लाख रुपये पंधराव्या वित्त आयोगाच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा केले त्यासाठी सक्षम प्राधिकार्याची मंजुरी घेतली नाही.
याशिवाय देयकातून सरकारी कपाती व ईपीएफमधून कपात केलेल्या रकमांचा भरणा केला नाही, विविध योजनांचे लेखे व कॅशबुकमधील त्रुटी, पीसीपीएनडीटी, बॉम्बे नर्सिंग ॲक्टअंतर्गत परवाना देण्यामध्ये त्रुटी, सेवा हमी कायद्यानुसार देण्यात येणाऱ्या सेवेत अनियमित, विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसणे, राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील कंत्राटी पदे भरतीत अनियमितता, जैवविविध कचरा प्रकल्पातून मिळणाऱ्या रॉयल्टीमधील अनियमितता असे अनेक आक्षेप समितीने डॉ. बोरगे यांच्यावर ठेवले होते.
याबाबत वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. बोरगे यांना नोटीस बजावून विचारणा केली होती. मात्र त्यांनी याबाबत अद्याप खुलासा केला नाही. अपहाराच्या आरोपावरून डॉ. अनिल बोरगे व विजयकुमार रणदिवे या दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांना अटक करण्यात आली होती व पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली होती.
डॉ. बोरगे यांनी लोकसेवक म्हणून स्वतःच्या पदाचा व अधिकराचा गैरवापर करून गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन करत मनपा कर्मचाऱ्यास अशोभनीय गैरवर्तन केल्याने, मनपाची जनमानसातील प्रतिमा मलिन झाली, त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम ३ (एक), (दोन), (तीन), (एक) मधील तरतुदीचा भंग केल्याच्या कारणावरून तसेच मनपा अधिनियम कलम ५६ (दोन), (फ) मधील तरतुदीनुसार निलंबित करण्यात आल्याचे आयुक्तांनी बजावलेल्या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.