मुंबईचे प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांना यशवंतभूषण पुरस्कार प्रदान
समाजाच्या जीवावर आपण शिकून मोठे होत असतो. याचे प्रत्येकाने भान ठेवून त्याची परतफेड समाजसेवेतून करावी, हे यशवंतरावांचे विचार आजच्या समाजाला व शिक्षण क्षेत्राला उभारी देतील.
जुने परिवर्तनाचे विचार आज गैरलागू होत आहेत. हे बदलण्यासाठी यशवंतरावांचे विचार आत्मसात करावे लागतील, असे प्रतिपादन लातूरचे विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे संस्थापक डॉ. अशोकराव कुकडे यांनी केले.
शिक्षण मंडळ कराडतर्फे देण्यात येणारा ‘यशवंतभूषण पुरस्कार’ मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. शिक्षण मंडळचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, चंद्रशेखर देशपांडे, शिल्पा वाळिंबे, संजीव चिवटे, हरिकृष्ण घळसासी, शिरीष गोडबोले उपस्थित होते.
डॉ. कुकडे म्हणाले, की व्यक्तिगत उन्नतीच्या मागे न लागता समाजोन्नतीचा विचार तरुणांनी आत्मसात करावा. आयुष्यात उदात्त हेतूने ज्ञान घेऊन ते समाजाप्रती खर्च केल्याने खरी श्रीमंती मिळते. यशवंराव चव्हाण व लोकमान्य टिळकांच्या विचारांचा वारसा या संस्थेने जोपासल्याचा सार्थ अभिमान वाटतो.
राष्ट्र समृद्ध करण्याची ताकद शिक्षणाने निर्माण होत असते, तसेच उत्तर विचारांचे धनही शिक्षणातून प्राप्त होत असते.
जी शाळा व शिक्षण संस्था असे विचारधन देते ती खरी धनवान असते. शिक्षण मंडळ, कराड ही संस्था केवळ शिक्षणाचे नव्हेतर उत्तम संस्काराचे अविरत कार्य करण्यास यशस्वी झाल्याने ती दीपस्तंभासारखी ठरली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, की यशवंतराव चव्हाणांच्या नावाने व त्यांच्याच शाळेत मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी संस्काराची शिदोरी ठरेल. आदर्श नेता ते सच्चा समाजसेवक अशी बिरुदावली लाभलेले यशवंतराव आजच्या राजकारण्यांसाठी आदर्श आहेत. महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारणाला त्यांनी संपन्न व समृद्ध केले. राज्यात शिक्षणाचा विस्तार करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. सद्य:स्थितीत विद्यापीठांची संख्या वाढली ही शिक्षण क्रांतीची लक्षणे आहेत.
प्रत्येकाच्या हातांना काम व बुद्धीला वाव देण्यासाठी शिक्षण हाच महत्त्वाचा पर्याय आहे. वास्तवात शिक्षणाचे होणारे व्यापारीकरण थांबवणे हे शिक्षण क्षेत्रातील मोठे आव्हान आहे. शिक्षणाच्या व्यापारीकरणामुळे शैक्षणिक विषमता निर्माण होत आहे. शिक्षणाने समाज समृद्ध होतो हा चव्हाणसाहेबांचा विचार सद्य:स्थितीत आचरणात आणावा. चंद्रशेखर देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा