सांगली : समाजातील उपेक्षित, पीडित आणि गरीब वर्गासाठी सातत्याने सेवाकार्य करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे, असे प्रतिपादन चिंचवड (पुणे) येथील श्री शंकर महाराज सेवा मंडळाचे संस्थापक डॉ. अविनाश वैद्य यांनी केले.सांगली जिल्हा नगर वाचनालयतर्फे डॉ. वैद्य आणि त्यांच्या संस्थेस आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. डॉ. वैद्य यांच्या पत्नी डॉ. मनाली वैद्य यावेळी उपस्थित होत्या. सांगलीतील कार्यकर्ते शरद फडके यांच्या देणगीतून गेली २६ वर्षे हा पुरस्कार देण्यात येतो.
डॉ. वैद्य म्हणाले, आतापर्यंत १८०० रक्तदान शिबिरे घेतली, त्यामध्ये तीन लाख लोकांनी रक्तदान केले. प्लास्टिक मुक्तीसाठी एक लाख कापडी पिशव्या तयार करून त्या लोकांमध्ये वाटल्या. स्नेहसावली वृद्धाश्रमात ६० ते ९६ या वयोगटातील २४ आजी- आजोबांना आम्ही सांभाळतो. त्यांना सर्व सेवा निशुल्क देतो. समाजकार्य करताना अनेकदा असंख्य अडचणी येतात. काम थांबवावे, अशी मनस्थिती निर्माण होते; परंतु आपण जर जिद्दीने सतत कार्यरत राहिलो तर लोकही हळूहळू मदत करतात आणि आपल्या कार्याचे स्वरूपही विस्तारत जाते.
सांगली जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष श्रीकांत जोशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाचनालयाचे सहकार्यवाह मुकुंद पटवर्धन यांनी स्वागत केले. कार्यवाह सुहास करंदीकर यांनी प्रास्ताविक केले. वाचनालयाचे संचालक अभिजीत सोहनी यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी वाचनालयाचे संचालक विकास जोशी, प्रमोद बापट, ग्रंथपाल सुरेखा नाईक उपस्थित होते.