दिल्लीला राष्ट्रीय राजधानी घोषित करण्याच्या ब्रिटिश सरकारच्या सरकारी कार्यक्रमातून स्वाभिमानाने बाहेर पडलेल्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद ब्रिटिश लायब्ररीने घेतली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा महापुरुष घडविण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सयाजीरावांच्या कार्याची दखल भारतीय इतिहासकारांनी मात्र घेतली नाही, अशी खंत बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. त्याची सुरुवात बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड राजघराण्याच्या वारसदार राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी झाली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. प्रा. हरी नरके, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शिवाजी मदन, डॉ. दत्तात्रय आघाव, डॉ. प्रतिभा पाटील, नलिनी चोपडे आदींची उपस्थिती होती. राजमाता शुभांगिनीराजे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. सयाजीरावांनी बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठात शिक्षण, संशोधनासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांच्यातील अर्थतज्ज्ञ, घटनाकार घडविला. या निमित्त विद्यापीठाच्या वतीने महाराजा सयाजीराव घराण्याच्या वारसदार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.  
राजमाता शुभांगिनीराजे म्हणाल्या की, सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपतिपदाची सूत्रे हाती घेऊन एक महिना झाला. आपल्या कार्यकाळात पहिलाच कार्यक्रम बाबासाहेबांच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठात होत असल्याचा मनस्वी आनंद आहे. औरंगाबादप्रमाणे बडोदा ही गुजरातची सांस्कृतिक, ऐतिहासिक राजधानी आहे. बाबासाहेबांनी औरंगाबादेत, तर महाराजांनी बडोद्यात बहुजन, कष्टकरी, वंचित समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. या दोन्ही महापुरुषांच्या विचारांना उजाळा मिळण्याचा हा ऐतिहासिक प्रसंग आयुष्यभर स्मरणात राहील. १९११मध्ये इंग्रज सरकारने दिल्लीला भारताची राजधानी जाहीर करण्यासाठी देशभरातील संस्थांनिकांना आमंत्रित केले होते. अत्यंत साध्या वेषात उपस्थित राहून सोहळयातून महाराजा सयाजीराव बाहेर पडले. लंडन टाइम्सने ‘गायकवाड इन्सल्टस् द क्राऊन’ अशा मथळयाने याचे वर्णन केले होते. त्याच देशातील ब्रिटिश लायब्ररीत महाराजांवर फिल्म पाहण्याचा योग आला. महाराजांचे मोठेपण भारतीय इतिहासकारांना समजले नाही, असेही राजमाता म्हणाल्या.
कुलगुरु डॉ. चोपडे म्हणाले की, कोलंबिया विद्यापीठाने अमेरिकेला सहा राष्ट्राध्यक्ष, तर जगाला २१ पंतप्रधान दिले. ४१ नोबेल विजेतेही तेथेच घडले. मात्र, सर्वात गुणवंत विद्यार्थी म्हणून डॉ. आंबेडकर यांची निवड या विद्यापीठाने केली. या ऐतिहासिक कार्यास सयाजीरावांनी दिलेले मोलाचे योगदान यातून उतराई होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले. बाबासाहेबांच्या उत्तुंग कार्याचा परामर्श घेणारा ‘आम्ही पाहिलेले बाबासाहेब’ हा ग्रंथ लवकर साकारणार असून डॉ. वि. ल. धारुरकर संपादक राहणार आहेत. प्रा. हरि नरके व बाबा भांड यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम देशमुख, तर संजय िशदे यांनी आभार मानले.
एकपात्री नाटय़ाचा प्रयोग
प्रा. प्रताप कोचुरे यांनी सादर केलेल्या ’येस, आय अॅम डॉ. बी. आर. आंबेडकर’ या एकपात्री नाटय़ाचा प्रयोग झाला. या नाटय़ामागची भूमिका डॉ. अरिवद गायकवाड यांनी विशद केली. ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ. गणेश मंझा, परीक्षा नियंत्रक डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. सुहास मोराळे आदींची उपस्थिती होती.

Story img Loader