भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व राम नवमीनिमित्त उत्सव साजरे करण्यात येत आहेत. या दोन महापुरुषांच्या जयंतीनिमित्त जबरीने निधी जमा करणाऱ्यांविरुद्ध तक्रार आल्यास खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येतील, तसेच महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमास गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी केले.
डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शहरात गुरुवारी, तर राम नवमीनिमित्ताने शुक्रवारी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम शांततेत पार पडावेत, या साठी सोमवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बठक घेण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, तहसीलदार किरण आंबेकर, पोलीस उपाधीक्षक प्रसंन्न मोरे, न.प.चे मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, मधुकर मांजरमकर यांच्यासह विविध समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थितांमधून डी.जे.च्या परवानगीची मागणी केली असता कणसे म्हणाले, की डी.जे. ५५ डेसिबलच्या आतच वाजविणे बंधनकारक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास कायद्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला.
शहरातील रस्त्यांवरील खड्डे, मिरवणुकीत सहभागी असलेल्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पथदिवे आदींबाबत त्यांनी माहिती घेतली. शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. जयंती साजरी करताना मिरवणुकीला गालबोट लागणार नाही? याची काळजी घ्यावी, दोन दिवस दारूबंदीचे आदेश आहेत. यानंतरही मिरवणुकीत मद्यपान करून शांतताभंग करणाऱ्यांवर, तसेच दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. जयंतीच्या नावावर निधी जमा करणे हा प्रकार योग्य नाही. जबरीने निधी जमा केल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला. जयंतीच्या कार्यक्रमात निळ तसेच गुलालाचा वापर करण्याऐवजी महापुरुषांच्या मिरवणुकीत फुलांची उधळण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा