औरंगाबाद – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ५ जून रोजीच्या परीक्षेच्या पाश्र्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची उद्या (४ जून) रोजी होणारी सर्व अभ्यासक्रमाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यापीठाने संलग्नीत महाविद्यालयांना ही माहिती एका पत्राव्दारे कळवली आहे.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कळवल्यानुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा ५ जून रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी औरंगाबाद शहरातील महाविद्यालये परीक्षा केंद्र म्हणून देण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित महाविद्यालये ४ जून रोजी राखून ठेवावीत. संबंधित कारणाच्या अनुषंगाने पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. त्याबाबतच्या सुधारित तारीख स्वतंत्र्यरित्या कळवण्यात येतील, असेही विद्यापीठाच्या पत्रात म्हटले आहे.