कराड: थोर समाजसुधारकांनी समाज परिवर्तनाची मोठी चळवळ उभारली. त्याच चळवळीला भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. शिक्षण, परिवर्तनाचा ध्यास त्यांनी घेतला. संविधान निर्मितीतून सर्वांना समान अधिकार दिल्याने बाबासाहेब कोणत्याही एका समाजाचे नेते, राष्ट्रपुरुष नव्हे; तर ते राष्ट्रनिर्माता असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. ईश्वर रायण्णवर यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची येथील भवानी शाखा आणि लोककल्याण मंडळ न्यासातर्फे आयोजित ‘राष्ट्रनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह व लोककल्याण मंडळ न्यासाध्यक्ष विजय जोशी व कराड शहर कार्यवाह महंतेश तुळजणवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. रायण्णवर म्हणाले, की तत्कालीन परिस्थितीत रंजल्या, गांजलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी खूप खस्ता खाल्ल्या. हलाहल पचवलेल्या शिवशंकराप्रमाणे बाबासाहेबांनी अनेक अपमान, अन्याय, अत्याचारांचे विष पचविले. समाजाच्या मुक्तीचे द्वार खुले करण्यासाठी स्वतः शिक्षण घेतले. शिक्षण संस्था सुरू केल्या.
करुणायुक्त अंत:करणाने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची अट घातली. वृत्तपत्र स्थापन करून समाजजागृती केली. ‘संघटित व्हा आणि संघर्ष करा’, या त्यांच्या वक्तव्यामागे समाजातील कुप्रथा दूर करण्यासाठी संघर्ष करा, असा अर्थ होता. मात्र, यांसह त्यांच्या अन्य वक्तव्ये, विचारांचा तत्कालीन राजकारण्यांनी केवळ राजकारण म्हणून वापर केला. त्यांना एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांना आपले मानणाऱ्यांनी त्यांना आपल्या कवेत साखळदंडाने बांधून ठेवले, इतरांनीही त्यांना त्याच दृष्टीने पाहिले. मात्र, बाबासाहेबांचे चरित्र जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या मनातील पूर्वग्रह दूर केले पाहिजेत, असे मत रायण्णवर यांनी मांडले.
‘हिंदू म्हणून जन्मलो. परंतु, हिंदू म्हणून मरणार नाही’, असे म्हणणाऱ्या बाबासाहेबांनी राष्ट्रीयतेच्या कक्षा ओलांडून धर्मांतर करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. काही वर्गाने बाबासाहेबांनी हिंदूंवर अन्याय केल्याचे म्हटले. मात्र, अशावेळी हिंदूंचा उपकारकर्ता म्हणून हा समाज माझा उल्लेख करेल, असे बाबासाहेबांनी म्हटले होते. तो दिवस आला असल्याचे प्रा. रायण्णवर यांनी सांगितले.