राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख व वरिष्ठ कापूस पैदासकार डॉ. रावसाहेब भारूड हे अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या कपाशीच्या जागतिक स्तरावरील सहयोगी संशोधन कार्यक्रमामध्ये सहभागी झाले.
अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये कापूस पिकविणाऱ्या अर्जेटिना, कोलंबिया, इजिप्त, ग्रीस, भारत, केनिया, पाकिस्तान, सुदान, टांझानिया, तुर्की, झांबिया, अमेरिका आदी १२ देशांतील वरिष्ठ कापूस शास्त्रज्ञ व संशोधक सहभागी झाले. परिषदेत जागतिक स्तरावर कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच जागतिक स्तरावर कापसाची सद्य:स्थिती, कापसाच्या किमती व त्याविषयी आगाऊ अंदाज वर्तविणे, कापूस व पर्यावरण, जागतिक बाजारपेठ, आयात-निर्यातीच्या संधी, आशिया खंडातील देशामध्ये कापूस पिकाची स्थिती, कापसाची उत्पादकता व गुणवत्ता वाढविण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा उपयोग, जागतिक स्तरावर कापसाच्या कमी उत्पादकतेची कारणे व त्यावर उपाय, विकसनशील देशात कापूस लागवडीच्या संधी आदी विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतातील कापूस शेतकऱ्यांच्या प्रयोगास शास्त्रज्ञांनी भेटी देऊन शेतकरी अवलंब करीत असलेल्या प्रगत तंत्रज्ञानाची पाहणी केली. डॉ. भारूड यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून देशात कापूस संशोधनातील उल्लेखनीय घडामोडी आणि प्रगती या विषयावर सादरीकरण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा