डॉक्टर व रुग्ण यांच्यामध्ये संवाद-समन्वय हवा, मात्र, याच्या अभावामुळेच समाजात अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. रुग्णांशी डॉक्टरांचे आचरण कसे असावे या बाबतही शिकण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोकराव कुकडे यांनी केले.
मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ. गिरीश मंदरकर यांचा दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात सत्कार करण्यात आला, त्या प्रसंगी ते बोलत होते. खासदार सुनील गायकवाड, डॉ. अमरनाथ सोलपुरे, उद्योजक अजय ठक्कर, डॉ. विलास वांगीकर, डॉ. कमलाकर मंदरकर, अलका मंदरकर, डॉ. कविता मंदरकर आदींची उपस्थिती होती. डॉ. कुकडे म्हणाले की, डॉक्टर व रुग्ण यांच्यात संवाद नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात. डॉक्टरांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी चांगले संवाद व आचरण ठेवून वैद्यकीय सेवा देण्याची गरज आहे. डॉ. मंदरकर यांच्या माध्यमातून मेडिकल कौन्सिलवर लातूरला प्रतिनिधित्व मिळाले, हासुद्धा लातूर पॅटर्न असल्याचे त्यांनी सांगितले. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने वैद्यकीय शिक्षणसंस्थांवर नियंत्रण ठेवून तेथून चांगले विद्यार्थी बाहेर पडतील याची काळजी घेण्याची गरज डॉ. सोलपुरे यांनी व्यक्त केली. प्रत्येक डॉक्टर रुग्ण बरा व्हावा, म्हणूनच सेवा देत असतो. साहजिकच डॉक्टरवर हल्ला करून राग व्यक्त करू नका, तर त्यांच्याकडे माणूस म्हणून बघा, असे आवाहन डॉ. मंदरकर यांनी या वेळी सत्काराला उत्तर देताना केले. खासदार डॉ. गायकवाड, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संतोष कवठाळे, डॉ. भट्टड, डॉ. विलास वांगीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. संयोजन समितीच्या वतीने डॉ. मंदरकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. गोपाळ बाहेती यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संगीता गटागट यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा