जागतिक पातळीवर कुष्ठरोग निवारण कार्यात अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कारासाठी या वर्षी डॉ.विजयकुमार डोंगरे व चीनचे डॉ. झेंग ग्युसेंग यांची निवड करण्यात आली आहे. महात्मा गांधींच्या प्रेरणेने १९५१ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या येथील गांधी मेमोरिअल लेप्रसी फोंउडेशनतर्फे  या पुरस्काराची घोषणा शनिवारी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष धीरूभाई मेहता यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
उपराष्ट्रपती हे या पुरस्कार निवड समितीचे पदसिध्द अध्यक्ष असतात, तसेच अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, आरोग्यमंत्री, समाजकल्याण मंत्री, केंद्रीय आरोग्य सहसंचालक यांच्यासह दहा मान्यवरांची समिती पुरस्कारप्राप्त व्यक्तीची निवड करते. रोख २ लाख रुपये व सन्मानपत्र स्वरूपातील या पुरस्काराची सुरुवात तत्कालिन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या सूचनेने करण्यात आली. महात्मा गांधी यांची कुष्ठसेवा व त्यामागील शास्त्रीय दृष्टिकोनाचे स्मरण ठेवण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आला असून, तो दर दोन वर्षांंनी दिला जातो. डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे हे गेल्या ५० वर्षांंपासून कुष्ठरोग निवारणाच्या कार्यात आहेत. सध्या ते राष्ट्रीय कुष्ठरोग संघटनेचे अध्यक्ष असून, सोसायटी फ ॉर द इरॅडिकेशन ऑफ  लेप्रसी (मुंबई) या संस्थेचे सचिव आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही ते अशा अन्य संघटनांशी संलग्न आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे कुष्ठरोगावरील पन्नासवर शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.  चीनचे डॉ. झेंग हे चीन नॅशनल लेप्रसी कंट्रोलचे संचालक आहेत. चीनमधील कुष्ठरोगविषयक विविध शासकीय व स्वयंसेवी संस्थांचे ते संचालक, तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या कुष्ठरोग विभागाचे ते तांत्रिक सल्लागार आहेत. त्यांनी कुष्ठरुग्णांसाठी चीनमध्ये प्लास्टिक सर्जरीचा विस्तार केला. कु ष्ठरोग्यांचे सामाजिक व आर्थिक पुनर्वसन करण्याच्या त्यांच्या विविध उपक्रमांची जगभर प्रशंसा होते. ‘गांधीजींच्या नावे असलेला हा पुरस्कार मला नवी प्रेरणा देणारा असून गांधीजींच्या विचारांचे पालन करून कुष्ठरोग्यांसाठी अधिकाधिक कार्य करण्याचा प्रयत्न मी करेन,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी निवड समितीकडे व्यक्त केली आहे. यावर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.