रत्नागिरी : समुद्रात जवळपास ९३ टक्के कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतला जातो. वर्षाला ३० टक्के कार्बन काढून टाकला जातो. पृथ्वीवरील ९३ टक्के उष्णतेचे नियंत्रणही येथेच केले जाते. समुद्रावरच मनुष्य जीवन अवलंबून आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या प्लास्टिकचे प्रदूषण, अतिमासेमारी, खारफुटीची तोड यामुळे २०२५ पासून कार्बनचे शोषण करणारी समुद्री यंत्रणा कोलमडण्याची भिती जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. के. कथीरेसन यांनी व्यक्त केली आहे. याकरिता समुद्राचे संवर्धन आणि खारफुटीची लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा…रत्नागिरी जिल्ह्यातील काताचे अवैध कारखाने बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश

आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनतर्फे मत्स्य महाविद्यालयात तृतीय सागर महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कथीरेसन बोलत होते. डॉ. कथिरेसन हे एक जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी भारताच्या किनारपट्टीवर व्यापक क्षेत्रीय अभ्यास केला आणि सुमारे ४ हजार जैविक प्रजातींचे संकलन केले. जगातील इतर कोणत्याही देशात खारफुटीच्या जंगलात इतक्या प्रजाती आढळल्या नाहीत. त्यांनी एका नवीन खारफुटी प्रजातीचा शोध लावला आणि तिला त्यांच्या विद्यापीठाच्या नावावरून रायझोफोरा अन्नामालयन असे नाव दिले. त्यांचे व्याख्यान ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना लाभली.

डॉ. कथीरेसन यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व खास शैलीत विद्यार्थी व अभ्यासकांशी संवाद साधला. भारताला लाभलेला ८ हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा, किनारपट्टीवरील मंदिरे, उत्सव यांची माहिती दिली. खारफुटी, कोरल्स, समुद्री गवत, खडकाळ व वाळूमय किनारे, खाड्या, मीठागरे यांची माहिती दिली. समुद्राची जैवविविधता सांगताना मासे, पक्षी, कासव, व्हेल, खेकडे अशी विविधता सांगितली. भारताच्या ८ हजार किमी समुद्र किनारपट्टीवर ४८६ शहरे व ३ हजार ४७७ खेडेगाव, वाड्यांमध्ये ३० टक्के लोक राहतात. जगात द्वितीय क्रमांकांचे माशांचे उत्पादन भारतात होते. २८ दशलक्ष लोकांची रोजीरोटी यावर अवलंबून आहे. ब्लू इकॉनॉमीअंतर्गत ४ टक्के जीडीपी व ९५ टक्के व्यापार म्हणजे मच्छीमारी, शेती व मत्स्य शेती, पर्यटन, सीविड फार्मिंग, बंदरे यावर अवलंबून आहे, असे डॉ. कथीरेसन म्हणाले.

उद्धाटनावेळी मंचावर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नरसिंह ठाकूर, मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे आणि आसमंतचे अध्यक्ष नंदकुमार पटवर्धन उपस्थित होते.

हेही वाचा…Torres Scam : टोरेस फसवणूकप्रकरणी आरोप असलेले सीए अभिषेक गुप्तांची न्यायालयात धाव; वकील म्हणाले, “युक्रेनिअन माफिया…”

यावेळी आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनसोबत गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ) सामंजस्य करार करणार असल्याची माहिती या संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नरसिंह ठाकूर यांनी दिली.

मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांनी क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग आणि भविष्यात सुनामीचा धोका आहे. ते कमी करण्यासाठी समुद्री गवत, खारफुटीचे संवर्धन केले पाहिजे असे सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr k kathiresan fears marine carbon sequestration collapse from 2025 due to plastic pollution and mangrove cutting sud 02