येत्या गुरुवारपासून सुरू होत असलेल्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ संशोधक डॉ. दिलीप नागवेकर, छायाचित्रकार चारुदत्त नाखरे आणि भारतीय पर्यावरण व तंत्रज्ञान संस्था यांना ‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार, तर गोव्यातील खाणींच्या विरोधात संघर्ष करणारे रमेश गावस यांना ‘वसुंधरा सन्मान’ पुरस्कार देण्यात येणार आहे.
महोत्सवाच्या संयोजन समितीतर्फे आज पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि पीपल्स एम्पॉवरिंग मूव्हमेंट (पेम-राजवाडी) यांच्यातर्फे २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सत्रात ‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून समारोपप्रसंगी रविवारी (२ डिसेंबर) संध्याकाळी ‘वसुंधरा सन्मान’ पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रसिद्ध वनस्पती व निसर्गतज्ज्ञ डॉ. प्रकाश गोळे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  ‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार विजेते डॉ. नागवेकर नुकतेच भाटय़े येथील नारळ संशोधन केंद्रातून निवृत्त झाले. आपल्या कारकीर्दीत त्यांनी कोकणात नारळ, सुपारी आणि मसाल्याच्या पिकांच्या लागवडीसाठी सातत्याने प्रयत्न केले. राजापूरचे छायाचित्रकार चारुदत्त नाखरे यांनी वृत्तपत्रांना आवश्यक प्रासंगिक छायाचित्रे काढतानाच निसर्ग छायाचित्रणाचीही कला आवर्जून जोपासली, तर रत्नागिरीतील भारतीय पर्यावरण संस्था आणि तंत्रज्ञान संस्था शालेय पातळीपासून विविध स्तरांवर पर्यावरणाच्या जतन-संवर्धनासाठी दीर्घकाळ प्रयत्न करत आली आहे.  गोव्यातील डिचौली येथील रमेश गावस यांनी तेथील खाणींच्या विरोधात गेले सुमारे एक तप चालवलेला एकाकी लढा कौतुकास्पद ठरला आहे. पेशाने शिक्षक असलेले गावस कोणतीही संस्था, संघटना पाठीशी नसताना बिगरराजकीय स्वरूपात हे काम चिकाटीने करत आले आहेत. तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात पदरमोड करून गावस यांनी कायदेशीर लढायाही जिंकल्या आहेत. नैसर्गिक खाजण जमिनी बुजवून त्यावर बांधकामे करण्याचे प्रकार गोव्यात वाढीला लागले आहेत. त्याही विरोधात गावस यांनी जनजागृती करून डिचौली गाव नष्ट होण्यापासून वाचवले आहे. त्यांच्या या अनोख्या संघर्षांचा आणि पर्यावरण रक्षणाच्या अथक प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी ‘वसुंधरा सन्मान’ पुरस्कार डॉ. गोळे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या महोत्सवात ‘पर्यावरणपूरक जीवनशैली’ या सूत्रावर आधारित सुमारे ४० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट/चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या विषयावरील रंगीत छायाचित्रांचे प्रदर्शन, निसर्ग फेऱ्या, तज्ज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा इत्यादी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.  महोत्सवाला प्रवेश मोफत आहे. मात्र मर्यादित जागांमुळे सदस्य नोंदणी आवश्यक आहे. या संदर्भात प्रसाद गवाणकर (९४२०१५८०८०) यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा