डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला संत आणि समाज सुधारकांच्या विचारांची जोड दिल्यामुळे हे काम अत्यंत प्रभावीपणे जनमानसात रुजले गेले, असे प्रतिपादन लोकसाहित्याच्या अभ्यासिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी केलं. त्या नरेंद्र दाभोलकर अभिवादन सभेच्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीच्या वतीने सोमवारी ( २० ऑगस्ट ) रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खुनाला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने रोटरी क्लब सभागृह विश्रामबाग येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी डॉ.दाभोलकरांच्या बारा पुस्तकांचे लोकार्पण सांगलीतील विविध क्षेत्रातील बारा महिलांच्या हस्ते केले गेले. यामध्ये डॉ. लता देशपांडे, प्रा. रेवती हातकणंगलेकर, उषा आर्डे, प्रा. आशा कराडकर, डॉ. नीलिमा शिंदे-म्हैशाळकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रणिता पवार, डॉ.सोनिया कस्तुरे, अॅड. तेजस्विनी सूर्यवंशी, गीता ठाकर, प्रा. राणी यादव, स्मिता मुलाणी, उज्वला परांजपे, ज्योती आदाटे यांचा समावेश होता.

यावेळी बोलताना प्रा. भवाळकर पुढे म्हणाल्या की, “लोकांचे प्रबोधन करताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अत्यंत संयमीत भाषा वापरली होती. लोक कलेच्या, लोक परंपरेच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन पूर्वपार सुरू आहे. लोकसाहित्यातील गोष्टींचा, संतविचारांचा आधार घेऊन प्रबोधन केले तर समाज ते लवकर स्वीकारेल.”

डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन सभेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. दाभोलकरांच्या सहअध्यायी डॉ. लता देशपांडे म्हणाल्या की, “मिरज मेडिकल कॉलेज येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि मी एकत्र शिकायला होतो. मेडिकल कॉलेज येथे त्यांनी विद्यार्थ्यांचे मोठे संघटन उभा केले होते. महाराष्ट्रातील पहिले खाजगी मेडिकल कॉलेज सोलापूर येथे सुरू झाल्यानंतर त्यांनी मिरज मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून मोठे आंदोलन उभारले. त्याचबरोबर फायनल वर्ष पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हते, तेव्हा त्यांनी सांगली येथील गांधी पुतळ्याजवळ सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून मोठा मोर्चा काढला आणि उपोषण केले. विद्यार्थी दशेतच डॉ. दाभोलकरांचे संघटन कौशल्य आम्ही जवळून अनुभवले आहे. कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे त्यांना कॉलेजमध्ये मान होता.”

हेही वाचा : “डॉ. दाभोलकरांच्या खुनाला १० वर्षे होऊनही मारेकरी मोकाट का?”; महाराष्ट्र अंनिसचा सरकारला सवाल

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शेजारी अनेक वर्ष राहणाऱ्या प्रा. रेवती हातकणंगलेकर म्हणाल्या की, “सांगली विलिंग्डन कॉलेजच्या आवारात दाभोलकर आणि हातकणंगलेकर ही कुटुंबे अनेक वर्षे शेजारी राहत होती. कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य असणारे देवदत्त दाभोलकर हे गांधीवादी होते. मोठ्या भावांकडेच डॉ. नरेंद्र दाभोलकर शिक्षणासाठी राहिल्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या गांधी विचाराचा प्रभाव पडला होता.”

प्रा. आशा कराडकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकांचा परिचय करून दिला. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्यांच्या या पुस्तकातून जिवंत आहेत असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : “डॉ. दाभोलकरांचा खून होऊन ३ हजार ५०० दिवस झाले, केंद्र-राज्य…”; अंनिसचं पुण्यात अभिवादन

जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा प्रणिता पवार म्हणाल्या की, “जिजाऊ ब्रिगेड ही महिलांच्या मधील चुकीच्या रूढी परंपरा बंद करण्यासाठी काम करते. तेच काम आणि अंनिस ही करते. आपण एकत्र काम केले तर समाजातील चुकीच्या रूढी परंपरा लवकर दूर होतील.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr narendra dabholkar 12 book launch 12 woman in sangli ssa