१४ ऑगस्ट २०१३ सकाळच्या वेळेस डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा फोन आला… येणारे दिवस गणपतीचे आहेत आणि ‘एक गाव एक गणपती’ तसंच ‘कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन’ या उपक्रमांना तब्बल वीस वर्षे पूर्ण होत आहेत. खूप मोठा प्रवास आहे, प्रदीर्घ लेख ‘लोकप्रभा’साठी लिहिण्याची इच्छा आहे. तत्काळ होकार दिला. त्यानंतर दोनच दिवसांत लेख लिहून झाल्याचा सरांचा फोन आला. हाती लिहिलाय, मुंबईत पाठवायची व्यवस्था करतो, असं म्हणाले. दोन दिवसांनी पुण्यातून परत त्यांचा फोन आला तेव्हा लोकसत्ता पुणे कार्यालयात लेख देतो असं सर म्हणाले… आणि त्यानंतर २० ऑगस्टच्या सकाळी सरांची पुण्यात निर्घृण हत्या झाली. दाभोलकर सरांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा लेख गणपतीच्या आधीच्या अंकात प्रसिद्ध करता येईल का यासाठी आम्ही चाचपणी केली तेव्हा त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांकडून जे कळले त्यानुसार डॉक्टरांनी ‘लोकप्रभा’साठीच्या लेखाची तयारी केली होती. टिपणं काढली होती. त्या टिपणांचे कागद सापडले. आणि ते टिपण लेखासह आम्ही त्याच वर्षी गणपतीपूर्वीच्या साप्ताहिक लोकप्रभाच्या अंकात प्रसिद्धही केले. लेखातील माहिती आणि तपशील पाहता या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना किती प्रचंड आव्हानांना सामोरे जावे लागले आहे आणि यापुढच्या काळातही किती आव्हाने आहेत याची कल्पना येते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेला व लोकप्रभाने प्रसिद्ध केलेला त्यांचा अखेरचा लेख वाचकांसाठी जसाच्या तसा पुन्हा प्रसिद्ध करत आहोत…
विसर्जित गणपती दान करा, हा उपक्रम बघता बघता जनचळवळ बनला. एखादा उपक्रम जनचळवळ बनणे याचा आनंद असला तरी यात विशेष ते काय घडले, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लोकमानसाला एखादी गोष्ट पटते व फार मोठय़ा प्रमाणात त्या बाबीचे अनुकरण, आचरण झाले की आपोआपच उपक्रमाचे रूपांतर चळवळीत होते. परंतु विसर्जित गणपती दान करा, याबाबत असे सरळ साधेसोपेपणाने हे घडून आले असे वर वर पाहणाऱ्याला दिसत असले तरी प्रत्यक्षात ही वाटचाल एखाद्या विवेकवादी चळवळीच्या दृष्टीने अतिशय आश्वासक मानावी लागेल. धर्माबाबत चिकित्सक भूमिका घेणाऱ्या व्यक्ती, संस्था, चळवळी यांनादेखील यामध्ये विचारमंथनासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आढळतील. एका लेखाच्या मर्यादेत या विषयाची मांडणी रूपरेखा या स्वरूपात पुढे मांडली आहे. या विषयावर सविस्तर व सर्व तपशिलांसह मांडणी करणारे पुस्तक लिहिण्याचा मानस आहे.
पुरोगामी चळवळी व धर्म
धर्माबाबत पुरोगामी चळवळीत तीन प्रमुख विचारधारा आढळतात. कठोर बुद्धिप्रामाण्यवादी असे मानतात की, धर्म ही वैज्ञानिक दृष्टिकोन अवगत होण्यापूर्वी मानवाने निर्माण केलेली बाब आहे. त्या त्या काळात त्याची प्रस्तुतता असेलही; परंतु आजच्या विज्ञानयुगात सर्वच धर्म सारख्याच प्रकारे कालबाह्य़ झाले आहेत. शिवाय धर्माचा इतिहासही काही फारसा स्पृहणीय नाही. धर्माच्या नावाने मानवी समूहात जेवढा रक्तपात झाला आहे तेवढा अन्य कशामुळेही झालेला नाही. यामुळे धर्माकडे पाठ फिरवून विवेकाच्या आधारे वाटचाल करणे हेच श्रेयस्कर आहे.
धर्माबद्दलची दुसरी भूमिका मार्क्सवादाची आहे. त्यांचे मत असे की, उत्पादन साधने व उत्पादन संबंध या चौथऱ्यावर कुठल्याही समाजाचा पाया तयार होतो. समाजातील शोषणाचे मूळ कारण समाजनिर्मितीचा हा पायाच चुकीच्या चौथऱ्यावर रचला गेला आहे हे असते. शोषण अटळ असते ते या सदोष सामाजिक पायामुळे. या पायावर साहित्य कलाधर्म यांची उध्र्ववास्तू उभी राहते. याचा अर्थ असा की, धर्मामुळे होणारा अन्याय, पिळवणूक केवळ धर्माची चिकित्सा करून दूर होऊ शकत नाही, तर धर्म मानणाऱ्या कोटय़वधी लोकांबद्दल सहानुभूती बाळगूनही प्रयत्न करावयाचा असतो तो धर्माचे घटित ज्या भौतिक पायावर उभे आहे तो पाया बदलण्याचा. धर्माबद्दलची लोकशाही समाजवादी भूमिका ही साधारणपणे भारतीय संविधानात असलेल्या मांडणीप्रमाणे आहे. भारतीय घटना व्यक्तीला उपासनेचे, धर्मपालनाचे, पारलौकिक कल्याणाचे आणि आत्मिक उन्नतीचे त्याला श्रेयस्कर वाटणारे कोणतेही मार्ग अनुसरण्याची अनुमती देते. अट एवढीच आहे की, त्यामुळे कायदा-सुव्यवस्था, सार्वजनिक नीतिमत्ता, सार्वजनिक आरोग्य व राष्ट्रीय एकात्मता तसेच घटनेने नागरिकांना प्रदान केलेले मूलभूत लोकशाही अधिकार यांना बाधा येता कामा नये. या मांडणीप्रमाणे व्यक्तीला स्वत:च्या जीवनात धर्मपालनेची पूर्ण मुभा आहे. मात्र राजसत्तेला अथवा शासनाला स्वत:चा असा पारंपरिक अर्थाचा कोणताही धर्म नाही. याच घटनेतील तरतुदीप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोन व शोधक बुद्धी हीदेखील नागरिकांची कर्तव्ये सांगितली आहेत. व्यवहारात मात्र याबाबतचा अनुभव काय येतो? मतांच्या अनुनयासाठी सर्व धर्माच्या कर्मकांडांची भलावण खरे तर लांगूलचालन सर्वच राजकीय पक्ष करीत असतात. दुसरीकडे याबाबत टीका करणारे पुरोगामी, लोकशाही समाजवादी घटनेतील तरतुदींप्रमाणे मिळालेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधरे चिकित्सा करण्याचा आपला हक्क सोयीस्करपणे दुर्लक्षित करतात.
वरील सर्व मांडणीतून व्यवहारामध्ये निष्कर्ष निघतो तो हाच की, धर्म ही बाब या ना त्या कारणाने सहेतूक व अहेतूकपणे दुर्लक्षिली जाते व दूर ठेवली जाते. यामुळे धर्माच्या आधारे राजकारण करू इच्छिणाऱ्यांना धर्माचे मैदान आयतेच मोकळे सापडते.
‘विसर्जित गणपती दान करा’मागील भूमिका
कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १९९२ साली पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्याचे दान मागण्यास सुरुवात केली. हा उपक्रम लोकांनी एकदमच उचलून धरला आणि टनावारी निर्माल्य प्रतिवर्षी जमा होऊ लागले. त्याचा उपयोग खत करण्यासाठी केला जाऊ लागला. बघता बघता हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पसरला. १९९८ साली कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी गणेशमूर्तीचे दान घेण्याचा निर्णय घेतला. त्यामागील वैचारिक भूमिका अत्यंत तर्कसंगत होती. एकतर श्रींच्या मूर्तीची गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना होते आणि त्याद्वारे त्या मूर्तीत देवत्व येते, असे मानले जाते. अनंत चतुर्दशीला वा परंपरेप्रमाणे त्या आधी उत्तरपूजा केल्यानंतर मूर्तीमधील देवत्व निघून जाते. मूर्ती मातीचा गोळा बनते आणि पाण्यात ती विसर्जित केली जाते. यामुळे धार्मिकदृष्टय़ा उत्तरपूजेनंतर केवळ मातीचा गोळा या स्वरूपात उरलेली मूर्तीच दान घेतली जाते. ही मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावी, असे धार्मिक मत आहे; परंतु बदलत्या काळाची नोंद घेतली तर काय आढळते? पूर्वीच्या मूर्ती मातीच्या अगर शाडूच्या असत. त्यांचे पाण्यात सहज विघटन होई. मूर्ती नैसर्गिक रंगांनी रंगविलेल्या असत. हे रंग वनस्पतींपासून बनविलेले असत. मूर्ती लहान होत्या. ज्या नद्यांमध्ये मूर्ती विसर्जित करत त्या वर्षांतून बराच काळ वहात होत्या. विहिरी आणि तळी यांना मुबलक पाणी होते. लोकसंख्या कमी होती. यामुळे गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित करण्याचा सहजसोपा मार्ग अमलात येत होता. सध्याच्या काळातील मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात. प्लास्टर ऑफ पॅरिसचे पाण्यात विघटन होत नाही. मूर्ती मोठय़ा प्रमाणात असतात. नद्या पावसाळ्यात देखील फार थोडा काळ राहतात. लोकसंख्या अफाट वाढली आहे. महाराष्ट्रात साधारणपणे एक कोटी कुटुंबात गणपती बसतो. एका घरगुती दीड फुटाच्या गणपतीमूर्तीचे वजन सुमारे तीन किलो असते. म्हणजे तीन कोटी किलो प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्याच्या स्त्रोतांमध्ये टाकले जाते. त्यामुळे प्रचंड गाळ साठतो. जिवंत झरे बुजतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या मूर्तीना मिळून शेकडो टन रासायनिक रंग लावले जातात.
धार्मिक प्रदूषणाबाबत कोणताच कायदा नसल्याने भाविकांनीच पुढाकार घ्यावयास हवा. शिवाय गणपती हा सुखकर्ता व दु:खहर्ता मानला जातो. त्याच्या मूर्तीद्वारे होणारे प्रदूषण हे दु:खकर्ते व सुखहर्ते ठरू शकते. यामुळे ते देवत्वच्या भावनेशीच विसंगत ठरते. शिवाय एकाच दिवशी काही थोडय़ा कालावधीतच हे प्रचंड प्रदूषण होते. हे सर्व लक्षात घेतले तर विसर्जति गणपती दान करा या उपक्रमाची आवश्यकता स्पष्ट होते.
गंभीर रासायनिक प्रदूषण
या मूर्तीना लावलेले शेकडो टन रंग रासायनिक असतात. रंगांचा पक्केपणा राहावा म्हणून केसीन वापरले जाते. ते कमी हानिकारक आहे. परंतु फार काळ टिकत नाही. ते सडते. ते सडू नये म्हणून त्यात सोडियम ट्रायक्लोरोफायनेट टाकतात. ते फारच घातक आहे. कुठल्याही रंगछटा बनवताना कॅटलिस्ट म्हणून अत्यंत विषारी पोटॅशियम सायनाईड वापरावे लागते. पेंटाट्रायथ्रीटॉल यासारखे इतर पदार्थही वापरलेले असतात. रंग लवकर सुकावेत यासाठी विविध प्रकारचे जे पदार्थ असतात, त्यात शिसे व पारा असतोच. हे सर्व रंग फार मोठय़ा प्रमाणात मूर्ती एकाचवेळी पाण्यात विसर्जित झाल्यामुळे धोकादायक प्रमाणात पाण्यात मिसळतात. नद्यांमध्ये सांडपाणी मिसळत असते. पण त्या सेंद्रिय द्रव्यांचे पाण्यातील जीवाणूंमुळे विघटन होते. प्रवाहाच्या दहा किलोमीटर वाहत्या पाण्यात ही नैसर्गिक क्रिया बऱ्याच अंशी पाणी स्वच्छ करते. रासायनिक द्रव्ये जीवाणूंचाही नाश करतात आणि वर गंभीर प्रदूषण करतात. पुण्यात ज्या कालव्यात ५० हजार गणपती विसर्जित होतात त्याचे पाणी २० टक्के पुणेकरांना दिले जाते व पुढे पुरंदपर्यंत लोक ते वापरतात. पाणी पाझरून ज्या विहिरींना लागते त्या विहिरींचे पाणीही प्रदूषित होते. ही रसायने त्वचारोगापासून ते मतिमंदत्व, कर्करोग अशा अनेक अरिष्टांना जन्म देऊ शकतात. पाणी पिणारे प्राणी, त्यावर येणारा भाजीपाला या सगळ्यांनाच हे पाणी घातक असते. जवळपास गटारगंगा बनलेल्या नदीतून मूर्ती वाहत जाताना दिसाव्यात म्हणून विसर्जनाच्या दिवशी मुद्दामहून पाणी सोडले जाते. दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार खडकवासला धरणातून तीन दिवस ५०० ते एक हजार ५०० क्युसेस पाणी मुठा कालव्यात सोडण्यात आले. या एकूण पाण्याची पुण्यातील मीटरनुसार किंमत दीडशे कोटी रुपये होते. तसेच धरण निम्मे भरले असतानाच हे पाणी सोडण्यात आले. हे सर्व करूनही मूर्ती नदीच्या काठावर सर्वत्र पसरलेल्या आढळतात.
विश्लेषण : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी काय? आरोपी कोण? आरोप काय?
समितीचा पर्याय
समितीने अमलात आणलेला पर्याय असा होता की, उत्तरपूजा करून पाण्याच्या स्रोतावर विसर्जनासाठी आणलेली गणेशमूर्ती संबंधितांनी समितीला दान द्यावी. भाविक आपापली मूर्ती घेऊन नदीत अथवा कॅनॉलमध्ये किंवा तळ्यात तीन वेळा पारंपरिक प्रथेप्रमाणे वर-खाली करीत आणि ती मूर्ती पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी पाण्यात न सोडता समितीच्या कार्यकर्त्यांकडे आणून देत. ही संपूर्ण मोहीम पूर्णत: प्रबोधनावर आधारित चालविली गेली व जाते. कोल्हापूर अंनिसने याबाबत एक आदर्श पद्धत घालून दिली. अशा अभिनव बदलाचे खरे वाहक विद्यार्थीच होऊ शकतात, हे ओळखले. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षकांना ही कल्पना पटविली. समितीचे कार्यकर्तेही शाळाशाळांतून गेले. वर्गावर्गात बोलले. सर्व विद्यार्थ्यांच्या घरी उपक्रमाची माहिती देणारे पत्रक जाईल, याची व्यवस्था केली. पत्रकावर कोल्हापुरातील विविध स्वरूपाच्या २४ संघटनांची नावे होती. पहिला गणपती दान घेण्यासाठी महापौरांना बोलाविण्यात आले. सर्व कार्यकर्ते नदीत ज्या ठिकाणी मूर्ती विसर्जित होतात त्यापासून दूरवर थांबले. ध्वनिक्षेपकावरून विनंती केली की, दान करावयाची मूर्ती संबंधित भाविकाने स्वत:च्या हातानेच आणून द्यावी, यावर कटाक्ष ठेवला गेला. आलेल्या मूर्ती ट्रकमधून हलविण्यात आल्या. गावाबाहेर दगडाच्या अनेक खाणी असतात. दगड काढल्याने त्यात भरपूर पाणी साठलेले असते. पाणी स्वच्छ असते. वापरात नसते. खाली कठीण दगड असल्याने पाणी झिरपले जात नाही. अत्यंत संवेदनशील असणाऱ्या या बाबीला कसा प्रतिसाद मिळतो याबद्दल कोल्हापूरचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती साशंक होती; परंतु पहिल्याच वर्षी समितीला ४०० मूर्तीचे दान मिळाले आणि अवघ्या पाच वर्षांत हा आकडा बघता बघता महाराष्ट्रात मिळून ४० हजारांवर गेला.
कराड येथील प्रतिसाद सांगण्यासारखा आहे. उपक्रम पार पाडावयाचा म्हणून कार्यकर्त्यां कृष्णा-कोयनेच्या संगमावर उभ्या राहिल्या. कल्पना अशी होती की प्रातिनिधिक स्वरुपात पाच मूर्ती तरी मिळाव्यात. परंतु अंदाज साफच चुकला. सकाळी दहा ते बारा या वेळातच ४०० मूर्तीचे दान मिळाले आणि दुपापर्यंत ही संख्या हजारावर गेली. लोकांच्या या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आणि कार्यकर्ते व साधने यांच्या अभावामुळे कार्यक्रम अक्षरश: आवरता घ्यावा लागला. पिंपरी-चिंचवडला असाच अनुभव आला. तेथे सुमारे सात हजार मूर्ती जमल्या. सगळ्यात उच्चांक केला नाशिक शहराने. नाशिक शहरात अंनिस कार्यकर्त्यांची संख्या अवघी १०-१५. सोबत राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी होते, पण एकूण संख्या मर्यादितच. मूर्ती विसर्जन करण्याच्या विविध स्थानांवर पहिल्या वर्षीच १२ हजार मूर्ती दान मिळाल्या आणि यंदा ती संख्या १७ हजारांवर गेली. महानगरपालिकेने १८ ट्रक आणि माणसे यांची सोय केली म्हणून बरे; अन्यथा एवढय़ा प्रचंड संख्येने आलेल्या मूर्तीचे करावयाचे काय, हा प्रश्नच होता.
पाण्याचे प्रदूषण रोखणे ही जबाबदारी आहे सरकार अथवा स्थानिक स्वराज संस्थांची. पुणे महानगरपालिकेने यात पुढाकार घेतला. पुण्यातील नदीच्या पात्रात सुमारे पाच लाख गणेशमूर्तीचे विसर्जन होते. मुळामुठा तर शब्दश: गटारगंगा झाली आहे. मूर्तीचे विसर्जन त्यांत करण्यासाठी भाविकांचा जीव धजावत नव्हताच. पुणे महानगरपालिकेने नदीच्या बाजूला शंभर तात्पुरते हौद विसर्जनासाठी उभारले. या वर्षी त्या हौदात जवळपास ८० हजार मूर्तीचे विसर्जन झाले. सोलापूर महानगरपालिकेने त्याचे अनुकरण केले. ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यातील सर्व तलावांत फार मोठय़ा प्रमाणात गणेशमूर्तीचे विसर्जन होते. शिवाय ठाणे शहरावर शिवसेनेचा प्रभाव आहे. तरीही पहिल्याच वर्षी ठाणे शहरात लक्षणीय मूर्ती दान मिळाल्या. धुळे नगरपालिका अलीकडेच बरखास्त झाली, कारण तेथे महानगरपालिका अस्तित्वात आली. यामुळे सध्या धुळे जिल्ह्य़ाचे कलेक्टर हेच धुळे महानगरपालिकेचे प्रशासक आहेत. ते स्वत: नदीच्या काठी विसर्जित गणपतींचे दान घेण्यासाठी उभे राहिले. पहिली मूर्ती दान मिळाली ती शिवसेनेची होती आणि दानमूर्तीची संख्या वाढतच गेली.
वैशिष्टय़पूर्णता
वर उल्लेख केलेल्या घटना या उपक्रमाचे रूपांतर जनचळवळीत होऊ लागले आहे याच्या स्पष्ट खुणा आहेत. हे सर्व महराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने आणि तुलनेने फार झपाटय़ाने संपूर्ण महाराष्ट्रात घडून आले. या घटिताचे नीट विश्लेषण व्हावयास हवे. ‘‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही देव आणि धर्माबाबत तटस्थ आहे. ही समितीची अधिकृत भूमिका आहे. मात्र लोकांना असेच वाटत आले आहे की समिती देव-धर्माच्या विरोधात आहे. याला अनेक कारणे आहेत. एकतर समितीच्या हितशत्रूंनी खोडसाळपणे हा प्रचार सतत केला आहे. दुसरे असे की, समितीतील बहुसंख्य कार्यकर्ते व्यक्तिगत जीवनात देव आणि धर्म यांपासून दूर राहून विवेकी माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करतात.’’ तिसरे असे की समितीने शनिशिंगणापूर येथे महिलांना प्रवेश द्या या स्वरूपाचा धर्मचिकित्सेच्या चळवळी चालवल्या आहेत. या सर्वाचा एकत्रित परिणाम काय होऊ शकतो? मुद्दा असा उपस्थित होतो की, देवाधर्माशी अंनिसवाल्यांचे काही देणेघेणे नाही. त्यांना धर्म, रूढी, परंपरा, कर्मकांड, त्याचे पावित्र्य याबद्दल काहीही कळत नाही. त्यामुळे त्यांनी धर्मसुधारणेच्या वाटेला न जाणे बरे.
शिवाय ‘फक्त हिंदू धर्मातीलच अंधश्रद्धांचे निर्मूलन करता काय? अन्य धर्मीयांबद्दल जरा बोला की’ हा मुद्दा असतोच. पुरोगामी मंडळी धर्माकडे पाठ फिरवून उभी होती आणि बोगस हिंदुत्ववाद्यांना धर्माचे मैदान मोकळेच होते. त्यावर परधर्म विद्वेषासाठी हिंसक कारवाया करण्यासाठी फौजफाटा जमा करावयास सुरुवात झालेलीच आहे आणि राजकीय सत्तेच्या खेळीत या धर्मविद्वेषाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. अशा वेळी कोणत्याही रूपाने का होईना, पण धर्माची कृतिशील चिकित्सा या मंडळींना परवडणारीच नाही. हे सर्व लक्षात घेतले तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विसर्जित गणपती दान करा या मोहिमेला प्रतिसाद मिळावयास नको होता. कडाडून विरोध व्हावयास हवा होता. वेगवेगळ्या अर्थाने, पण धर्मात तुमची लुडबुड कशासाठी? अशी शेरेबाजी ऐकत पुरोगामी आणि धर्मवादी या दोघांकडून समितीला थपडा मिळाल्या असत्या आणि कार्यक्रम उभाच राहिला नसता किंवा कसाबसा चालू झालेला उपक्रम क्षीण होऊन विझून गेला असता तर ते स्वाभाविकच मानले गेले असते आणि यासाठी हितसंबंधी शक्तींनी काही केले नाही असेही नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही देव आणि धर्माबाबत तटस्थ आहे. ही समितीची अधिकृत भूमिका आहे. मात्र लोकांना असेच वाटत आले आहे की समिती देव-धर्माच्या विरोधात आहे. याला अनेक कारणे आहेत. एकतर समितीच्या हितशत्रूंनी खोडसाळपणे हा प्रचार सतत केला आहे. दुसरे असे की, समितीतील बहुसंख्य कार्यकर्ते व्यक्तिगत जीवनात देव आणि धर्म यांपासून दूर राहून विवेकी माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करतात.
विरोधाचे (असफल) प्रयत्न
ज्या कोल्हापूर येथे विसर्जित गणपती दान करा ही मोहीम चालू झाली आणि महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचली त्या कोल्हापुरातच सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन या मोहिमेला कडवा आणि कडवट विरोध केला. हेच लोण पुढे कोल्हापूर जिल्ह्य़ातील इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी येथे पसरले. सर्व ठिकाणी पद्धत एकच, समितीचे कार्यकर्ते ज्या ठिकाणी गणेशमूर्ती दान मागणार असतील त्याही आधीपासून मोठय़ा संख्येने धर्मवादी कार्यकर्त्यांनी साखळी धरावयाची आणि मूर्ती पाण्यात विसर्जित करावयाची अघोषित सक्ती करावयाची. पोलिसांची भूमिका नेहमीप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही बाजूंना थोपवून धरणारी. स्वाभाविकच प्रत्यक्षात पाण्यातील विसर्जन चालू राही. याबरोबर आणखी दोन वाद उकरून काढावयाचे मुद्दे म्हणजे कचऱ्यासाठी वापरणारे ट्रक गणेशमूर्ती वाहतुकीसाठी वापरले जातात. याबाबत जिल्हा पोलीसप्रमुखांच्या सहकार्याने विशेष काळजी घेतल्यावर पुढचा मुद्दा असा की, महानगरपालिकेने अंनिसच्या कार्यक्रमाला ट्रक देण्याचे कारणच काय? समितीने स्वत:च्या खर्चाने वाहने आणावीत. याशिवाय आणखी दोन मुद्दे मांडले जातात. पहिला लोकांना चटकन पटणारा मुद्दा असा की नद्यांचे प्रचंड प्रदूषण सांडपाण्याच्या द्वारे होतच असते. त्याबाबत अंनिस कधीच काही बोलत नाही, फक्त अनंत चतुर्दशीलाच यांना पर्यावरणाचा पुळका येतो. याचे तपशीलवार उत्तर समितीने दिले आहे.
जे लोकांना पटले आहे. ते थोडक्यात असे, सांडपाणी प्रदूषण बहुधा जैविक बाबींनी होते. पाण्यातील जीवजंतू त्यावर प्रक्रिया करतात आणि त्यामुळे सांडपाण्यातील प्रदूषित पदार्थाचे आपोआप विघटन होते. म्हणूनच वाहत्या नदीचे पाणी दहा मैलांत आपोआप स्वच्छ होते असे मानले जाते. गणेशमूर्तीचे रासायनिक रंग हे पाण्यातील हे कार्य करणाऱ्या त्या जीवजंतूंनाच मारून टाकते. त्यामुळे वाहते पाणी स्वच्छ होण्याची शक्यताच राहत नाही. फिल्टर पाणी शहरांना पुरवले जाते हे खरे, परंतु नदीकाठच्या अनेक गावांना पाणी स्वच्छ करण्याची पुरेशी कार्यक्षम यंत्रणा नसते. पाण्याचे रासायनिक प्रदूषण दूर करणारी यंत्रणा तर नसतेच नसते. शिवाय पाण्याचे अन्य मार्गाने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कायदे आहेत, परंतु ‘‘धार्मिक प्रदूषणाबाबत कोणताच कायदा नसल्याने भाविकांनीच पुढाकार घ्यावयास हवा. शिवाय गणपती हा सुखकर्ता व दु:खहर्ता मानला जातो. त्याच्या मूर्तीद्वारे होणारे प्रदूषण हे दु:खकर्ते व सुखहर्ते ठरू शकते. यामुळे ते देवत्वच्या भावनेशीच विसंगत ठरते. शिवाय एकाच दिवशी काही थोडय़ा कालावधीतच हे प्रचंड प्रदूषण होते. हे सर्व लक्षात घेतले तर विसर्जति गणपती दान करा या उपक्रमाची आवश्यकता स्पष्ट होते.’’ सनातन भारतीय संस्थेकडून घेतला जाणारा दुसरा आक्षेप तर फारच गमतीशीर आहे. त्यांचे म्हणणे असे की, गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्याच्यात देवत्व येते. (त्याची प्राणप्रतिष्ठा करणाऱ्या ब्राह्मणात जर पावित्र्य, तेज नसेल तर मूर्तीत प्राण घालणार कोठून, असा प्रश्न वामनराव प यांनी दूरदर्शनवर महाचच्रेत विचारला होता.) ज्या वेळेला ही पवित्र मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जति होते त्या वेळी मूर्तीची पवित्रके (म्हणजे काय? ते त्यांचे त्यांनाच माहीत) पाण्याबरोबर वाहत सर्वत्र जातात. पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे संपूर्ण वातावरण शुद्ध होते. यासाठी वाहत्या पाण्यातच मूर्ती विसर्जति करावयास हव्यात, असा आग्रह सनातन भारतीय संस्थेचे कार्यकत्रे धरतात.
या वर्षी महाराष्ट्रातील अनेक शहरांत त्यांनी असा आग्रह धरून लोकांना मूर्ती दान देण्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. आश्चर्य म्हणजे लोकांनी त्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. पुण्यासारख्या ठिकाणी दान संकलन केंद्रात दोन हजारांहून अधिक मूर्ती जमल्या होत्या. त्या मूर्ती कोणत्याही स्वरूपात निर्गत करण्यास दान देणाऱ्यांची लेखी अनुमती होती. तरीही तेथे जाऊन या मूर्ती वाहत्या पाण्यातच विसर्जति करा, अशी हुज्जत घातली. दमदाटी करण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. गारगोटी हे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील एक गाव. लोकांच्या विरोधामुळे मागील वर्षी तेथे फक्त ३९ गणपती जमा झाले होते. यंदा स्वत: सरपंच अंनिस कार्यकर्त्यांच्या समवेत उत्साहाने या उपक्रमात उतरले आणि तुलनेत छोटय़ा गावात पाचशेहून अधिक मूर्तीचे दान मिळाले. इचलकरंजीत कोल्हापूर येथे विरोध होत राहिला, मात्र विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या कमी कमी होत गेली. कोल्हापुरात नदीकाठावर वेगवेगळ्या पाच ठिकाणी गणेशमूर्ती दानाचा उपक्रम चालतो. परंतु यापकी केवळ एकाच ठिकाणी विरोध होत राहिला. ते लोण कोल्हापुरात अन्यत्र पसरले नाही आणि महाराष्ट्रात तर अन्यत्र कोठेही ते पोहोचलेच नाही. ठाणे येथे काही पर्यावरणवादी संघटना आहेत. त्यांचा उपक्रमाला तत्त्वत: पूर्ण पाठिंबा होता. पण लोकांच्या धर्मभावनेशी संबंधित असलेल्या मूर्ती दान घेणे या थेट कृतीबद्दल त्यांच्या मनात जबर शंका होती. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमाला त्यांचा विरोधच होता, परंतु वास्तवात आलेला वेगळा अनुभव त्यांनाही सुखावून गेला. मल्हारपेठ (ता. पाटण, जि. सातारा) हे छोटेसे गाव ठाण्यात शिवसेनेचा नगरसेवक असलेल्या, पण मूळ या भागातल्या कार्यकर्त्यांने चार वर्षांपूर्वी या कल्पनेला कसून विरोध केला. त्याच मल्हारपेठमध्ये या वर्षी दूरदूरच्या वाडीवस्तीवरूनही लोकांनी मूर्ती दान केले. विशेष म्हणजे त्या भागातील १२ शाळांनी एकत्रितपणे आपले सर्व गणपती दान दिले. सातारा येथे दान मिळालेल्या मूर्ती वापरात नसलेल्या, पाणी असलेल्या, परंतु मालक बुजवून टाकणार असणाऱ्या एका विहिरीत कार्यकर्त्यांनी निर्गत केल्या. रस्त्यापासून विहिरीपर्यंत मूर्ती हलवताना आजूबाजूच्या बालचमूंनी मदत केली. नंतर कोणीतरी शोध लावला की संबधित विहीर ही मुस्लीम व्यक्तीची आहे आणि मदत करणाऱ्या बालचमूतही मुस्लीमच होते. या आगलाव्या प्रचाराकडे प्रसारमाध्यमांनी आणि लोकांनी पूर्ण दुर्लक्ष केले.
नाशिक येथे मूर्तीच्या प्रचंड संख्येमुळे कचऱ्याचा एक ट्रक (स्वच्छ धुतलेला) महानगरपालिकेने दिला. कार्यकर्त्यांनी वापरला. पत्रकाराने त्याचा अचूक फोटो टिपला, मात्र रात्री विचार करताना त्या पत्रकारालाच वाटले, समितीची मंडळी मनापासून प्रामाणिक हेतूने एवढे काम करत आहेत तर हा फोटो, ही बातमी आपण देणे बरोबर नाही आणि त्यांनी स्वत:हूनच तो फोटो समितीकडे आणून दिला. राजगुरूनगर येथे ५००-६०० मूर्ती दान मिळाल्या. ज्या ठिकाणी त्या निर्गत करावयाच्या होत्या त्या खाणीच्या मालकाने रात्री नकार दिला. ऐनवेळी पर्यायी व्यवस्था झाली नाही. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या कार्यालयात, दान मिळालेल्या मूर्ती ठेवण्यात आल्या व दुसऱ्या दिवशी त्या निर्गत करण्याचे ठरले. दान मिळालेल्या मूर्ती नदीतून दोन-तीन वेळा खाली-वर करून नंतर आणून दान दिल्यामुळे ओल्या झालेल्या होत्या. काही मातीच्या होत्या. काहींची जडणघडण चांगली नव्हती. ओल्या झालेल्या अनेक मूर्तीचे काही ना काही अवयव निखळले. त्या विद्रूप बनल्या. मूर्ती दान घेणे आणि तातडीने लगेच भरपूर पाण्याच्या अन्य जागेत निर्गत करणे आवश्यक असते, कारण त्याच कल्पनेने दान मिळालेले असते. कार्यकर्त्यांकडून चूक झाली. बातमी गावात गेली. प्रक्षुब्धता निर्माण झाली, तरीही काहीही विपरीत घडले नाही. सर्व मूर्ती पुन्हा ट्रकमध्ये भरून निर्गत केल्या गेल्या.
तीन वर्षांपूर्वी पुणे येथे विसर्जति गणपती दान करा या मोहिमेचा प्रारंभ तत्कालीन महापौरांच्या हस्ते होणार होता. ऐनवेळी पुण्याच्या महापौरांनी कार्यक्रमास येण्यास नकार दिला. त्यांना असे वाटत होते की यामुळे आपल्या मतदारांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल ते सांगता येणार नाही. ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर यांच्या हस्ते आम्ही तो कार्यक्रम करावयाचे ठरवले. गोवारीकर आले. गणेश मूर्ती दान देण्यासाठीतर अनेकजण आलेले होते. त्याच वेळी एक वकील महोदय आपल्या अनुयायांसह तेथे आले आणि सोबत आणलेल्या मोठमोठय़ा घटांचा अखंड घंटानाद त्यांनी चालू केला व आमचा संपूर्ण कार्यक्रम चालू असताना तो चालूच ठेवला. ज्यामुळे आम्ही उच्चारलेला एक शब्दही कोणाला ऐकू जाऊ शकला नाही. त्याच पुण्यात अवघ्या तीन वर्षांत वॉर्डावॉर्डात नगरसेवकांनी बोर्ड लावले की पाणी प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जित गणपती महानगरपालिकेने बांधलेल्या हौदातच विसर्जित करा.
पुढचे टप्पे
गणेश मूर्तीचे दान मिळण्याचा ओढा प्रचंड आहे आणि त्याला कार्यकर्ते पुरे पडणे अवघड होत आहे. हे समितीच्या लक्षात येऊ लागले आहे. याला पर्याय काय? एका पर्यायाचे नाव आहे ‘गणेशालय’. थोडक्यात कल्पना अशी की लोकांनी दान दिलेल्या मूर्ती बहुसंख्य वेळा चांगल्याच असतात. त्या गरजू संस्थांना द्यावयाच्या. त्यांनी स्वत:कडे त्या वर्षभर सांभाळावयाच्या आणि वर्षभरानंतर त्यांची विक्री करून आलेले पैसे आपल्या शिक्षण संस्थेसाठी (जे गणेशाचे खरे स्वरूप आहे असे मानता येईल) वापरावयाचे. या स्वरूपात स्वत:ची मूर्ती दान देणारे दोन हजार भाविक यावर्षी पुण्यात मिळाले. परंतु आश्चर्य म्हणजे या मूर्ती घेण्यासाठी प्रयत्न करूनही एकही संस्था तयार झाली नाही. कारण याबाबत नागरिकांची प्रतिक्रिया काय येईल याची त्या सर्व संस्थांना भीती वाटत होती. कुंभार अथवा मूर्तिकार यांनी मूर्ती घेऊन जाणे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना काही वह्य़ा पुस्तकांचे वाटप करणे हा आणखी एक पर्याय, यालाही प्रतिसाद नाही. परंतु पाच वर्षांपूर्वी विसर्जित गणपती दान करा याला तरी प्रतिसाद कोठे होता? या लेखाच्या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा असा की मूर्तीचे गणेशालय स्थापन करावे या सूचनेला स्वीकारावयास संस्थांना भीती वाटत असली तरी अशी सूचना करायला तुम्ही धजावताच कसे? असा आक्षेप कोणीही समितीवर घेतलेला नाही. म्हणजे धर्म चिकित्सेच्या या पातळीवरही जनमानस सजग बनण्याची शक्यता लक्षात येते.
‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यत सुरू केला त्यावेळचे जिल्हा पोलीस अधीक्षक माधवराव सानप यांनी त्यांच्या हाताखालचे अधिकारीही त्याबाबत साशंक होते. प्रत त्यांना फक्त ३० गणपती मिळाले. त्यांनी चिकाटीने हे काम चालूच ठेवले. यावर्षी त्याला शासकीय मान्यताही लाभली. महाराष्ट्राच्या २३ जिल्ह्यंत सहा हजार सातशे गावांत ‘एक गाव एक गणपती झाला’. ‘एक गाव एक गणपती’चे फायदे अनेक आहेत. परंतु मुद्दा वेगळा आहे. फायदे असलेल्या बाबी लोकांनी सहजासहजी पटत नाहीत आणि न्यायालयाने आदेश दिला तरी जुलमाचा रामराम करत पळवाटा शोधल्या जातात असा अनुभव येतो. गणेश मंडळे ही नेतृत्व तयार करण्याची मुशी मानली जाते. शिवाय त्यामुळे हातात दहा दिवस तरी का होईना बऱ्यापैकी पैसा खेळतो. शिवाय समाजात धार्मिक जल्लोष मोठय़ा प्रमाणात तयार होणे हे राजकीय सोयीसाठी हवेच असते. हे चक्र उलटे फिरणे शक्य नाही अशीच बहुतेक सर्वाची मनोमनी खात्री झालेली आहे. तर्काला ही गोष्ट पटते. व्यवहारात असेच घडेल असे वाटते, पण तरीही एकदम वेगळा विधायक व आश्वासक अनुभव कसा येतो? कोणतीही सक्ती नाही, कायदा तर नाहीच नाही ही स्थिती.
‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमाचे महत्त्व सांगणाऱ्या पोलीस दलांची विश्वासार्हताही फार नाही. पुण्यामध्ये गणेशोत्सवाचा महाजल्लोष होतो. असे असताना पुणे ग्रामीण भागात १८०० खेडेगावांपकी १३०० खेडेगावांत ‘एक गाव एक गणपती’ या वर्षी झाला. गेली तीन वष्रे हे प्रमाण सतत वाढते आहे आणि ज्या गावात हा उपक्रम एकदा सुरू झाला तेथे पुन्हा एक गाव दोन गणपती झाले नाहीत. एवढेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात हा विचार पोहोचला. लातूर जिल्ह्यात १२०० पकी ८०० गावांत हे घडून आले. तर धुळ्यासारख्या महानगर पालिकेच्या क्षेत्रातदेखील गणपतींची संख्या काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे. धार्मिक उत्सवांना आनंदापेक्षा अभिनिवेशाचा आणि खंडणी स्वरूपात जमा होणाऱ्या वर्गणीचा आधार लाभला आहे. याबाबत नेहमीच पुरोगामी शक्ती नाराजी व्यक्त करतात. ‘एक गाव एक गणपती’ हा याबाबत एक अक्सर उपाय आहे आणि पूर्णत: धार्मिक असलेला ग्रामीण जनसमूह त्याला पाठिंबा देत आहे, हे आश्वासक चित्र मानावे लागेल. याच पद्धतीने विचार करत गेले तर या प्रश्नाच्या गाभ्याला हात घालणारे दोन मुद्दे सापडतात. धार्मिक उत्सवांना आलेले प्रचंड उधाण हे वर्गणीच्या खुशीच्या सक्तीतून आलेले आहे. एकेका व्यक्तीला निमूटपणे चार-पाच ठिकाणी वर्गणी द्यावी लागते. याबाबत बोलताना महाचच्रेत मी सुचवले होते की, बिल्डिंगमध्ये अथवा भागामध्ये लोकांनी आपापल्या भागाचा दातृत्व कलश ठेवावा. त्यामध्ये आपणास शक्य असलेली वर्गणी प्रत्येकाने मनोभावे द्यावी. घरी वर्गणी मागावयास येणाऱ्या कोणासही आपण व्यक्तिगत वर्गणी देणार नाही, असे सांगावे. सर्वाच्या उपस्थितीत विशिष्ट तारखेला दातृत्व कलश उघडून त्यातील जमा रक्कम मंडळांना वाटून द्यावी. यामुळे पसे वाचतील हा भाग आहेच, पण धर्मभावना वेठीला धरून टगेगिरी करू इच्छिणाऱ्यांना योग्य तो संदेश पोचवण्याचे धाडस येईल. धर्माच्या गरवापराला रोखणारे ते प्रारंभाचे पाऊल ठरेल.
खरेतर एक प्रश्न गणेशोत्सवात उपस्थित करावयास हवा आणि मी तो या वर्षी केला. त्याला पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंपासून प्रसारमाध्यमांनी चांगला प्रतिसाद दिला. तो प्रश्न असा की, महाराष्ट्रात गणेशोत्सवात काही दशसहस्र मंडळे, लक्षावधी कार्यकत्रे आणि कोटय़वधी भाविक सहभागी होतात. काही हजार कोटींची उलाढाल करतात. गणपती बुद्धीचे दैवत मानले जाते. परंतु एवढय़ा प्रचंड जल्लोषात बुद्धीच्या दैवताचा सोहळा साजरा होत असताना अजूनही महाराष्ट्रातील ५० टक्के शालेय वयातील विद्यार्थी शाळेच्या बाहेर का, असा प्रश्नही कोणी उपस्थित करत नाही. याचाच अर्थ असा की, धर्माचा मूळ गाभा विसरून कर्मकांडी अवडंबर माजवले जात आहे.