वाई : सातारा पालिकेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक पुरस्कार या वर्षी उद्योजक व सातारा जिल्ह्यातील २८ गावांमध्ये लोकोपयोगी विकासकामे करणारे ‘सातारकर’ भारत फोर्जचे पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना पुण्यात वितरित करण्यात आला. सातारा पालिकेच्या वतीने दरवर्षी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक पुरस्कार देण्यात येतो.यापूर्वी नाम फाउंडेशनचे संस्थापक सिनेअभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना गौरविण्यात आले आहे. या वर्षीचा पुरस्कार मूळ सातारकर उद्योजक व जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये विकासकामे राबवणाऱ्या पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना जाहीर करण्यात आला होता. करोना नियमामुळे त्यांच्याच पुण्यातील कार्यालयात या पुरस्काराचे सोमवारी वितरण करण्यात आले. रुपये एक लाख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पुरस्कार समितीचे सदस्य विनोद कुलकर्णी, हरीष पाटणे, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा