प्रस्थापित नसलेल्यांनाही संधीचा पक्ष नेतृत्वाकडून संदेश

बीड : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागली. त्यामुळे पुन्हा एकदा मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर समर्थकांतून व्यक्त होत असला तरी केवळ वारसा आणि प्रस्थापित यापेक्षाही पक्षात इतरांनाही संधी मिळते हा संदेश दिला जात असल्याचे मानले जात आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय राहिलेले डॉ. कराड यांना पहिल्यांदाच राज्यसभा आणि वर्षभरातच थेट मंत्रीपद मिळाल्याने मुंडे भगिनी समर्थकांना नेमके काय व्यक्त व्हावे असा प्रश्न पडला आहे.

बीड जिल्ह्यतील भाजपचे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा सहा वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आणि आठच दिवसात अपघाती निधन झाले. त्यांचा राजकीय वारस मुलगी पंकजा मुंडे यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री तर दुसरी मुलगी डॉ. प्रीतम मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन खासदार केले. डॉ.प्रीतम मुंडे या दुसऱ्यांदा  लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात डॉ.प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल असा दावा समर्थकांकडून केला जात होता. मात्र पक्षाने वर्षभरापूर्वी राज्यसभेवर घेतलेल्या वंजारी समाजातील डॉ.भागवत कराड यांची वर्णी लावली. यामुळे पुन्हा एकदा पक्षाने मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर  समाज माध्यमातून समर्थकांनी लावला आहे. मात्र,पक्षाने केवळ  वारसा आणि प्रस्थापित यापेक्षाही समाजातील इतरांनाही संधी दिली जाते हा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगडावर मेळावा घेऊन प्रदेश नेतृत्वाविरुध्द अप्रत्यक्ष बंडच पुकारले होते. परिणामी विधानपरिषदेवर संधी मिळावी यासाठी प्रयत्न करुनही त्यांच्याऐवजी लातूरचे वंजारी समाजातील रमेश कराड यांना आमदार  केले. तर भागवत कराड यांनाही पक्षाने थेट राज्यसभेवर घेऊन पक्षात मुंडे भगिनींच्या शिफारशीशिवायही निर्णय होऊ शकतात हा संदेश दिला होता. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाजपबरोबर जोडलेला वंजारी व इतर ओबीसी समाज पक्षाबरोबर रहावा यासाठी भाजप नेतृत्वाने डॉ.कराड यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊन सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ.कराड हे बीड जिल्ह्यच्या सरहद्दीवर असलेल्या चिखली या गावचे असून ते औरंगाबादला स्थायिक आहेत. दिवंगत मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे मुंडे भगिनी समर्थकांना काय व्यक्त व्हावे असा प्रश्न पडला आहे.

वंजारी समाजाला केंद्रात तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व

पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्यांदा बीडचे खासदार  बबनराव ढाकणे यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली होती. त्यानंतर आता डॉ.भागवत कराड यांना संधी मिळाली आहे.

 

Story img Loader