गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार साडेचार महिन्यांपासून मनोज जरांगे लढा देत आहेत. यासाठी त्यांनी तीनवेळा उपोषणही केलं. मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे या अधिसुचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. तर मनोज जरांगे यांच्या मागणीच्या विरोधात लक्ष्मण हाके यांनीही उपोषण करत आंदोलन सुरु केलं होतं. मात्र, राज्य सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे. सध्या दोघांनीही उपोषण मागे घेतलं असलं तरी आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
असे असतानाच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या एका डॉक्टराला छत्रपती संभाजीनगरमध्ये काळं फासण्यात आल्याची घटना घडली आहे. मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये केलेल्या आंदोलनाला विरोध केल्याच्या कारणावरून डॉक्टराच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. डॉ.रमेश तारख यांनी मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीमधील आंदोलनाला विरोध केल्याचं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे.
हेही वाचा : “झुंडशाहीच्या बळावर आरक्षणाची मागणी करणं घटनाविरोधी”, लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका
नेमकं काय घडलं?
मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन केलं होतं. मात्र, या आंदोलनाच्या विरोधात डॉ.रमेश तारख यांनी प्रशासनाला अर्ज दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. डॉ.रमेश तारख यांनी आंदोलनाच्या विरोधात अर्ज दिल्याप्रकरणावरून काही मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
डॉ.रमेश तारख यांना आज काही मराठा आंदोलकांनी भेटण्यासाठी बोलावलं होतं. त्यानंतर डॉ.रमेश तारख यांचा सत्कार केला. मात्र, त्यानंतर डॉ.रमेश तारख यांच्या तोंडाला काळं फासलं. दरम्यान, यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
डॉ.रमेश तारख यांनी काय प्रतिक्रिया दिली?
“मला एकजणाचा फोन आला आणि सांगितलं की, आम्हाला पेंशंट दाखवायचं आहे. त्यानंतर ते बाहेर येऊन थांबले. त्यानंतर काहीवेळाने ते आतमध्ये आले आणि त्यांनी माझा सत्कार केला. यावेळी मी त्यांना विचारलं की सत्कार का केला. तर त्यांनी सांगितलं की तुमचा वाढदिवस आहे. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की आज माझा वाढदिवस नाही. त्यानंतर त्यांनी मला काळं फासलं”, अशी प्रतिक्रिया डॉ.रमेश तारख यांनी दिली. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.
मनोज जरांगे यांच्या मागण्या काय?
कुणबी नोंदी मिळालेल्या लोकांच्या परिवारालाही कुणबी प्रमाणपत्र मिळावे.
ज्याच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे.
ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांच्या सगे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे.
अंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे.