प्रशांत देशमुख

वनसृष्टीवरील दुष्काळी परिणामावर संशोधन 

अमेरिकेत संशोधक म्हणून कार्यरत डॉ. ऋतुजा चित्रा तारक यांना इकॉलॉजीतील यावर्षीचा आंतरराष्ट्रीय जॉन हॉर्पर पुरस्कार प्राप्त झाला असून हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत.

२००८ पासून ब्रिटिश इकॉलॉजिकल सोसायटीतर्फे  दरवर्षी हा पुरस्कार मूलभूत संशोधन करणाऱ्या युवा शास्त्रज्ञास दिला जातो. त्यासाठी आंतरराष्ट्रीय संशोधन (रिसर्च जर्नल्स) पत्रिकांतील  सर्वोत्तम संशोधनाची निवड संपादक मंडळ करते.

जागतिक हवामान बदलाचा जीवसृष्टीवर होणाऱ्या परिणामांवर जगभर संशोधन सुरू आहे. डॉ. ऋतुजा यांनी सात वर्षे उष्णकटिबंधीय शुष्क जंगलातील वनसृष्टीवर दुष्काळीस्थितीत काय परिणाम होईल, याचा सखोल अभ्यास केला. कमी पर्जन्यात जंगलातील वनस्पती अल्प पाण्यावर कसा सामना करतात, हा त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय होता. दूरवर पसरलेली मुळे व पाण्याचे स्रोत यातील परस्पर संबंधाचा तौलनिक अभ्यास हा आधार होता.

या अभ्यासात त्यांना असे आढळले की उथळ किंवा मध्यम खोलीवर मुळे असलेल्या वृक्षांपेक्षा खोलवर मुळे असलेल्या वृक्षांवर दुष्काळजन्य परिस्थितीचे गंभीर परिणाम होतात. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे वृक्षांच्या चयापचय प्रक्रियेवर ताण पडून वृक्ष मरायला लागतात.

वनस्पती परिस्थितीकी (इकॉलॉजी) शास्त्रातील  आजवरचे हे पहिलेच निरीक्षण. हा अभ्यास त्यांनी कर्नाटक व तामिळनाडू सीमेवरील मदुमलाई राष्ट्रीय उद्यानातील ५० हेक्टर परिसरातल्या बारा प्रकारच्या प्रजातींच्या ७ हजार ६७७ वृक्षांचा तसेच २००३ ते २००५ या दाहक दुष्काळी काळात मृत झालेल्या वृक्षांच्या आधारावर केला. १९९२ ते २०१२ या काळात पडलेला पाऊस, भूगर्भातील जलपातळी या पाश्र्वभूमीवर दर उन्हाळय़ात जमिनीच्या वेगवेगळय़ा खोलीवर पाण्याची उपलब्धता तपासली होती.

या अभ्यासावर संगणकीय प्रारूप तयार करीत डॉ. ऋतुजा यांनी अमेरिकेतील शीतकटिबंधीय वृक्षांना हेच निष्कर्ष लागू होतात काय, याविषयी अभ्यास करीत आहेत. जगभर दुष्काळी परिस्थितीत खोलवर मुळे असणाऱ्या वृक्षांची भर मोठय़ा प्रमाणात होत असल्याने त्याची कारणमीमांसा करण्यासाठी तसेच प्रत्येक दुष्काळात वृक्षांची किती प्रमाणात हानी होऊ शकते, हे तपासण्यासाठी हे संशोधन मोलाचे ठरणार आहे.

वृक्ष  हानी झाल्यास भविष्यात दुष्काळजन्य स्थिती अधिकच गंभीर होण्याचा धोका डॉ. ऋतुजा संशोधनातून व्यक्त करतात.

पर्यावरणतज्ञ डॉ. तारक काटे यांची कन्या असलेल्या डॉ. ऋतुजा २ वर्षांपासून ‘स्मिथसोनियम एन्हायर्नमेंट रिसर्च सेंटर’ येथे कार्यरत होत्या. तीन महिन्यांपूर्वी अमेरिकेतीलच ‘लॉस अल्मास नॅशनल लेबॉरेटरी’ या संस्थेत संशोधक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. स्थानिक शालेय शिक्षणानंतर बंगलोरच्या प्रसिद्ध ‘आयआयएस’ मधून ‘परिस्थितीकी शास्त्र (इकॉलॉजी) या विषयात पीएचडी प्राप्त केली. हा पुरस्कार यापूर्वी २०१३ला डॉ. नितीन सिकर या भारतीय वंशाच्या अमेरिकन शास्त्रज्ञास मिळाला होता. मात्र, २०१८चा हा पुरस्कार पटकावणाऱ्या डॉ. ऋतुजा या खऱ्या अर्थाने पहिल्या भारतीय शास्त्रज्ञ आहेत.

नवी दालने उघडतील

या संशोधनामुळे दुष्काळी परिस्थितीचा वेध घेऊन अपेक्षित उपाययोजनांचा अंमल करण्यावर आता गांभीर्याने भर दिला जाईल, असे वाटते. संशोधनास चालना देणारा हा पुरस्कार मला या क्षेत्रातील नवी दालने उघडणारा ठरेल. इकॉलॉजी विषयातील हा पुरस्कार एका भारतीयाने प्राप्त केल्याचा आनंद सर्वानाच होईल, अशी भावना डॉ. ऋतुजा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.