आपल्याकडे आजवर खोटा इतिहास लिहून त्याला पुन्हा खोटय़ा इतिहासानेच उत्तर दिले गेले. इतिहासकार राजवाडे यांनी जातीच्या आधारावर इतिहास लिहून महाराष्ट्राचा इतिहासच जातीय केला. इतिहासकार शेजवलकर यांनी ५० वर्षांपूर्वीच सांगितलंय की, शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहिला गेलाय. खरं तर महाराजांचा खोटा इतिहास लिहून त्यांना वेठीस धरले गेले आहे. आता तर शिवाजी महाराज प्रत्येकाची मक्तेदारीच झालेल्या या काळात त्यांचा खरा इतिहास लिहिणे कठीणच. मात्र मनोहर कदम यांनी कामगार चळवळीचे नेते नारायण मेघाजी लोखंडे आणि तेलगू समाजाचा मुंबईच्या विकासातील योगदानाचा खरा इतिहास लिहून मौलिक काम केले, असे प्रतिपादन अ. भा. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सदानंद मोरे यांनी येथे केले.
सिंधुदुर्ग-गढीताम्हणेचे सुपुत्र इतिहासकार मनोहर कदम स्मृती प्रबोधन महोत्सव येथील म्हाळसाबाई ट्रस्टच्या पटांगणावर डॉ. मोरे यांच्या उपस्थितीत झाला. परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या महोत्सवाला डॉ. मोरे यांच्यासह ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते कॉ. नरसय्या आडम, साहित्य अकादमी पुरस्कारविजेते ज्येष्ठ लेखक डॉ. राजन गवस, विख्यात नाटककार संजय पवार, सामाजिक कार्यकर्त्यां सुरेखा दळवी, मनोहर कदम यांच्या पत्नी तथा ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, मनोहर कदम महोत्सव समितीचे अध्यक्ष जीवराज सावंत, ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, किशोर जाधव, महोत्सव समितीचे सचिव अंकुश कदम, मधुकर मातोंडकर, तेलगू समाज अध्यक्ष गज्जन बाबू गंजी, विनोदसिंह पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, खोटा इतिहास लिहिला गेला त्याला कसा प्रतिसाद करायचा हा खरा प्रश्न आहे. खोटय़ा इतिहासाला उत्तर सत्याने द्यायला हवे. शास्त्रीय आधारावर इतिहास लिहायला आपल्याकडे ब्रिटिशांच्या काळात प्रारंभ झाला. बंड करण्याच्या प्रेरणा मिळू नये म्हणून बऱ्याच वेळा खोटा इतिहास लिहिला गेला. ९० टक्के इतिहास जातीय पद्धतीनेच लिहिला गेलाय. यामुळे चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी जपून इतिहासाचा स्वीकार करायला पाहिजे. आज जगण्याचे प्रश्न जटिल झाल्याने चुकीच्या पद्धतीचा इतिहास स्वीकारून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू नये. पण महाराष्ट्राचा इतिहास जातीय केला तो आपण सांगितला पाहिजे. इतिहासात राजवाडे यांनी जातीची भांडणे लावली आणि आपला इतिहासच दूषित झालाय.
यातून ब्राह्मणांचे महत्त्व वाढत गेले. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास अजून लिहिला गेला नाही. त्यामुळेच ज्यांना आताचे प्रश्न सोडवायचे आहेत त्यांनी इतिहासात फार जाऊ नये!
डॉ. बाबा आढाव म्हणाले, आज राजकारणाचा जो गदारोळ चालला आहे, त्यात मनोहर कदम हे आमदारही होऊ शकले असते. पण त्यांनी संशोधनाचा मार्ग निवडला. आद्य कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांचे चरित्र लिहून त्यांचे कर्तृत्व त्यांनी पुढे आणले. त्यातून कामगार चळवळीचा भारतीय आयाम जगापुढे माणसाच्या अंतकरणापर्यंत पोहचला. सनातन गोष्टी आपोआप जाणार नाहीत. यासाठी आपण परिवर्तनवादी कोणता कार्यक्रम लोकांसमोर ठेवणार आहोत यातूनच या घटनांना आळा बसणार आहे. यासाठी आपण सर्वानी मतभेद विसरून मूल्यांची बांधीलकी स्वीकारायला पाहिजे. यासाठी सांस्कृतिक एकसंधतेची गरज निर्माण झाली आहे. जातिव्यवस्थाही काल्पनिक आहे. विज्ञानाचा त्याला आधार नाही. आपण जातीची चिकित्सा करणारा विषय अभ्यासक्रमात घेऊ शकलो नाही. कामगारांची देशात एवढी उपेक्षा आहे की, कोणत्याही धर्माला लाज वाटेल. यासाठी मनोहर कदम यांनी जमिनीशी नाते सांगितले, ते पुढे घेऊन आपण जायला हवे.
आपला इतिहास चुकीचा सांगून माणसालाच मारले जात असले तरी विचाराला कधीच मारता येणार नाही. विचारी माणसे चुकीच्या पद्धतीने राजकारणात जातात तेव्हा मूल्यांच्या लढाईला मर्यादा येते.
नरसय्या आडम म्हणाले, तेलगू समाजाचा इतिहास लिहून मनोहर कदम यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात मोठे काम केले आहे. त्या पुस्तकाचे माझ्या हस्ते प्रकाशन झाले, याचा मला आनंद होत आहे. आता मात्र माणुसकी सोडून पसे खाण्याची प्रवृत्ती बळावली आहे. अशा काळात देशातील असंघटित कामगारांना पेन्शन कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. आता प्रतिगामी विचाराचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यांच्या सांस्कृतिक दहशतवादाला गांभीर्याने घेऊन त्याला भीक घालता नये. डॉक्टर, इंजिनीअरही पसे घेऊनच मते देत असतील तर यापासून घटनेलाच धोका पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळेच सगळ्या परिवर्तन चळवळीतील माणसांनी मतभेद विसरून समान कार्यक्रम तयार करण्याची गरज आहे. ज्या राज्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांसारख्या माणसांचा खून होऊन त्याचा शोध लागत नाही, तिथे सगळ्यांनी संघटित होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
राज्यभरातून इतिहासप्रेमींचा लक्षणीय सहभाग लाभलेल्या या प्रबोधन महोत्सवात जीवराज सावंत, सचिन परब, किशोर जाधव आदींनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक अंकुश कदम यांनी केले.
इतिहासकार मनोहर कदम यांच्या पत्नी प्रतिमा जोशी म्हणाल्या, रक्ताच्या नात्याची, मित्र नसलेल्या माणसांनी मनोहर कदम यांच्या स्मृती जागृत करण्यासाठी हा प्रबोधन महोत्सव आयोजित केला. यामुळे माझे मन भरून आलेय. शिव्यांच्या पलीकडे मालवणी भाषा आणि साहित्य आहे हे वाटत असल्यानेच मनोहर यांनी ‘शबय’सारखा कथासंग्रह लिहिला. मात्र आता संविधानातून धर्मनिरपेक्षता शब्दच काढण्याचा हा काळ आहे. त्यामुळे आपण सर्व संविधान जपणारी माणसे असून सगळ्यांनी आता एकत्र येऊ या!
इतिहास संशोधन केंद्राचे उद्घाटन
उद्घाटन सत्रात पत्रकार सचिन परब यांनी संपादित केलेले ‘इतिहासकार मनोहर कदम’ या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन नरसय्या आडम यांच्या हस्ते करण्यात आले. तर याचवेळी कणकवलीत कायमस्वरूपी सुरू करण्यात येणाऱ्या मनोहर कदम इतिहास संशोधन केंद्राचे उद्घाटन सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा