नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी देऊनही अर्ज दाखल न केल्यावरून काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. झालेल्या प्रकारानंतर पक्षश्रेष्ठींशी बोलल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता काँग्रेसचे नेते डॉ. सुधीर तांबे यांनी त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी आपण लहानपणापासून काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता असल्याचं सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुधीर तांबे म्हणाले, “मी लहानपणापासून काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मला कारवाईबाबत समजलं. मात्र, या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मला काहीही बोलायचं नाही.”

हेही वाचा : फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यातच सत्यजित तांबे यांच्या बंडाची बिजे

नेमकं काय घडलं?

पक्षविरोधी भूमिका घेऊन शिस्त मोडल्याने ही सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांच्या मान्यतेने शिस्तपाल समितीने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात चौकशी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. काँग्रेसने सुधीर तांबेंवरील निलंबनाच्या कारवाईचे पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.

काँग्रेसने सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला असतानाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांना अपक्ष अर्ज भरायला मदत केली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा : Photos : तुम्ही भाजपा पुरस्कृत उमेदवार होणार का? सत्यजीत तांबे म्हणाले, “एका उदात्त हेतूने…”

तांबेंच्या बंडखोरीनंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. ही पक्षासोबत फसवेगिरी आहे. तर सत्यजीत तांबे यांनी आपण भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचे विधान केले. तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr sudhir tambe first reaction on suspension action by congress nashik graduate constituency election pbs