जागतिक मराठी संमेलनात डॉ. सुखदेव थोरात यांचे मत; गरिबी कमी करणारा विकास गरजेचा
सामाजिक भेदभावाला जे बळी ठरले त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी आरक्षणाची योजना करण्यात आली आहे. परंतु आरक्षणातून ज्यांना समृद्धी लाभली असेल त्यांनी स्वत:हून सरकारच्या आर्थिक सवलती नाकारायला हव्यात, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.
वनामती सभागृहात आयोजित जागतिक मराठी संमेलनानिमित्त आज शनिवारी आयोजित प्रगट मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. लोकसत्ताचे विदर्भ आवृत्ती प्रमुख देवेंद्र गावंडे व ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे यांनी ही मुलाखत घेतली. देशाच्या वर्तमान विकास पक्रियेबाबत विचारलेल्या प्रश्नावर डॉ. थोरात म्हणाले, आज जे विकासाचे चित्र दिसत आहे ते पायाभूत सुविधांचे आहे. परंतु यातून दारिद्रय कमी होणे शक्य नाही. गरिबी कमी करणारा विकास व्हायला हवा. समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचत नसेल तर सरकारने विकासाच्या धोरणाबाबत फेरविचार करायला हवा.
वैचारिकदृष्टया आजच्या राजकारण पतही घसरली आहे. प्रत्येकाला धर्म प्रसाराचे मूलभूत अधिकार आहेत. परंतु काही राज्यांमध्ये मंत्र्यांची निवडच मुळात धर्म बघून केली जाते हे योग्य नाही. आज देशात मागासवर्गीय, अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागासवर्गीय विद्यर्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात अडचणी येत आहेत. परिणामी अनेकांचे शिक्षण थांबले आहे. या विद्यार्थ्यांवर अगदी ठरवून हल्ले केले जात आहेत. फक्त भाजपच नव्हे तर गैरभाजप शासित राज्यांमध्येही असे प्रकार सुरू आहेत. सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेऊन मागासांना सरपंचपदी बसण्याचा मार्गही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अल्पसंख्यक समुदायांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आज सरकारने मोठया प्रमाणात खाजगीकरणाचे धोरण स्वीकारले आहे. याचा लाभ केवळ उच्चभ्रू लोकांनाच होईल. त्यामुळे शिक्षणात विषमता निर्माण होऊन तरुणाईमध्ये अन्यायाची भावना वाढील लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाबासाहेबांच्या चळवळीची अनेक शकले वेदनादायी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची आज अनेक शकले झाली आहेत. ती उघडया डोळयांनी पाहणे फारच वेदनादायी आहे. सामाजिक संक्रमनाच्या या काळात आंबेडकरी अनुयायांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ते गटातटात अडकून पडत असतील तर यात त्यांचेच मोठे नुकसान होणार आहे.