लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : ज्ञान प्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त, ज्येष्ठ कार्यकर्त्या, कवयित्री, लेखिका डॉ. स्वर्णलता चंद्रशेखर भिशीकर (वय ७३) यांचे दीर्घ आजाराने सोलापुरात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोरे हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मूळच्या नागपूरच्या असलेल्या डॉ. स्वर्णलता भिशीकर ह्या पुण्यातील तत्कालीन तरुण भारत वृत्तपत्राचे संपादक चं. प. भिशीकर यांच्या कन्या होत. अलीकडेच त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. बंगळुरूच्या स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेत तीन महिने योग उपचार घेऊन त्या सोलापुरात परतल्या होत्या. परंतु, अखेर त्यांचे निधन झाले.

१९८९ साली सोलापुरात अवंतिकाबाई केळकर यांच्या बालविकास मंदिर शाळेचे हस्तांतरण ज्ञान प्रबोधिनी संस्थेत झाले, तेव्हा त्याची जबाबदारी उचलण्यात ज्ञान प्रबोधिनीचे दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा ताम्हणकर यांच्या बरोबर डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचा सिंहाचा वाटा होता. १९९३ साली मराठवाड्यात किल्लारी-सास्तूर भागात महाप्रलयकारी भूकंप झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात लोहा तालुक्यातील हराळी येथे निवासी शाळेची उभारणी केली होती. या माध्यमातून डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्याचा मोठा मानदंड प्रस्थापित केला होता. या कार्यातून त्यांची मराठवाड्याशी जोडलेली नाळ शेवटच्या क्षणापर्यंत होती.

डॉ. भिशीकर यांनी मानसशास्त्रीय शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण करीत ‘वाचन कौशल्ये’ विषयात पीएच. डी संपादन केली होती. ज्ञान प्रबोधिनीमध्ये प्रज्ञा मानस संशोधिका म्हणून दहा वर्षे वाचन कौशल्ये, अनुषंगिक मानसशास्त्रीय संशोधन आणि प्रशिक्षणात त्यांनी मोठे योगदान दिले होते. अमेरिकेतील ‘इंडियाना युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया’ येथे दोन महिने त्यांनी अतिथी व्याख्यात्या म्हणून काम केले होते.

अध्यात्मिक अंगाने सामाजिक व शैक्षणिक कार्य करताना डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे अलीकडच्या काळातील संत, योगी श्री बाबा महाराज अर्विकर समाधी मंदिरात वर्षभर मौन साधना केली होती. रामकृष्ण परमहंस, स्वामी समर्थ यांच्यावरील व्यासंगी अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती

Story img Loader