सांगली : साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक असती तर मी या जन्मी अध्यक्ष झाले नसते असे मत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्यावतीने नेमगोंडा पाटील पुण्यतिथीनिमित्त साहित्यक्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल डॉ. भवाळकर यांना जनसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ५० हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन जेष्ठ समिक्षक प्रा.अविनाश सप्रे यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान सोहळा झाला. यावेळी श्रीमती भवाळकर बोलत होत्या.

श्रीमती भवाळकर म्हणाल्या, साहित्य संमेलनाचे मला मिळालेले अध्यक्षपद हे अपघाताने मिळालेले पद आहे, निवडणूक असती तर माझी निवड झालीच नसती. ५५ वर्षापुर्वी या सांगलीत आले, सांगली किती चांगली हा अनुभव मला मिळाला.साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले. आयुष्याच्या उतरार्धाच्या टोकावर अपघाताने मिळालेले अध्यक्षपदाचे पद आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आधी निवडणूक व्हायची, कुठल्याही निवडणूकीत राहणे ही आपली प्रवृत्ती नाही.यावेळी साहित्य संमेलनासाठी जर निवडणूक असती तर कदाचित माझी निवडच झाली नसती.यावेळी प्रथमच निवडणूक नव्हे तर निवड पध्दत साहित्य मंडळाने अवलंबल्याने माझी निवड झाली.मराठी भाषिकांचे प्रेम हा प्रत्येकाचा सन्मान आहे.ज्यांनी मराठी भाषा टिकवली,वाढवली अशा सर्वाचाच हा सन्मान आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याची चर्चा आज खूप होते आहे. परंतू जेव्हा स्त्रीने पहिली ओवी गायिली असेल तेव्हाच माझ्या मते भाषेचा जन्म झाला ,भाषेला मायबोली म्हटले जाते. आज आईची मम्मा झाल्याने लोकांना मराठीचे काय होणार याची भिती वाटते आहे. मुळात भाषा ही व्यक्ती नाही, तर संवादाचा पूल आहे. भाषा आहे म्हणून आपण आहोत असे भवाळकर म्हणाल्या.

Story img Loader