येत्या रविवारी (३१ मार्च) होत असलेल्या गुहागर नगर पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत उमेदवारांपेक्षा भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव यांचीच खरी कसोटी लागणार आहे.
नगर पंचायत हद्दीतील चार प्रभागांमध्ये मिळून एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होत असून ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव यांच्या या मतदारसंघात राष्ट्रवादीची काँग्रेसशी आघाडी होऊ शकलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सर्व जागा लढवत असून तीन ठिकाणी त्यांची काँग्रेसच्या उमेदवारांबरोबर मैत्रीपूर्ण लढत आहे. भाजप-सेना युतीने मात्र येथे जागांबाबत समझोता करण्यात यश मिळवले आहे. १७ जागांपैकी भाजप १५, तर सेना २ ठिकाणी निवडणूक लढवीत आहे. या व्यतिरिक्त काँग्रेसचे ३, मनसेचे ४ आणि आरपीआयचा १ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र मुख्य लढत अपेक्षेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्येच आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत जागावाटपाच्या तडजोडीत हा मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेने स्वत:कडे घेतला. त्यामुळे मावळते आमदार डॉ. विनय नातू यांनी बंडखोरी केली. त्याची परिणती शिवसेनेचे मातब्बर नेते रामदास कदम यांच्या पराभवात झाली आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव या मतदारसंघातून सहज विजयी झाले. जाधव यांच्याकडे नगरविकास खात्याचे राज्यमंत्रीपद आल्यानंतर त्यांनी जिल्ह्य़ातील देवरुख आणि गुहागर या दोन ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि मागील वर्षांच्या अखेरीस पूर्तताही केली. त्यामुळे तालुक्यात प्रथमच नगर पंचायत अस्तित्वात आली आहे.
नगर पंचायतीच्या प्रस्तावाला भाजपचा आधी पाठिंबा होता, पण पालकमंत्र्यांनी त्यात पुढाकार घेतल्यामुळे तांत्रिक मुद्दय़ावर विरोध सुरू झाला. त्यासाठी उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे, पण न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती न दिल्यामुळे ती प्रक्रिया कायम राहिली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारात डॉ. नातू यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्तिगत गाठीभेटींवर जास्त भर दिला. पालकमंत्र्यांनी तालुक्यातील विकास योजनांसाठी निधी न आणल्याची टीका हे कार्यकर्ते करत आहेत. गेल्या आठवडय़ात पालकमंत्र्यांनीही निवडणूक प्रचार सभांचा धडाका लावत तालुक्यात आणलेल्या निधीची आकडेवारीही सादर केली. तसेच डॉ. नातू यांनी मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे केलेल्या बंडखोरीचीही मतदारांना आठवण करून दिली.
चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांचा गट पालकमंत्र्यांच्या कायम विरोधात राहिला असून याही निवडणुकीत त्यांच्याकडून दगाफटका होण्याची शक्यता पालकमंत्र्यांचा गट गृहीत धरून काम करत आहे. त्याचप्रमाणे शेजारच्या रायगड जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते सुनील तटकरेही पालकमंत्र्यांच्या विरोधात आहेत. राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे आणि त्यांचे खासदारपुत्र नीलेश यांचे जाधवांशी असलेले परंपरागत सख्य सर्वज्ञात आहे. त्यामुळे भाजप-सेना युतीबरोबर या अंतर्गत विरोधकांचाही सामना त्यांना करावा लागत आहे. दुसरीकडे मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा गट डॉ. नातू यांच्या बंडखोरीमुळे तेव्हापासूनच नाराज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आरपीआयनेही काही जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्याचा फटका युतीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.
मागील विधाससभा निवडणुकीपासून तालुक्यात झालेल्या उभयपक्षी राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर नगर पंचायतीची निवडणूक होत आहे. येत्या सोमवारी निवडणुकीचा निकाल असून डॉ. नातू आणि जाधव यांच्यातील संभाव्य लढतीची रंगीत तालीम म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
नगर पंचायत निवडणूक : गुहागरात नातू-जाधवांची कसोटी
येत्या रविवारी (३१ मार्च) होत असलेल्या गुहागर नगर पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत उमेदवारांपेक्षा भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव यांचीच खरी कसोटी लागणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-03-2013 at 12:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr vinay natu and bhaskar jadhav real test in guhagar local body election