भारतीयांचे दैवत असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या सेवेची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, अशा शब्दांत डॉ. सर विल्यम वॉन्लेस यांनी आपल्या भावना त्यांच्या आत्मचरित्रात नोंदविल्या आहेत. हे आत्मचरित्र नुकतेच उपलब्ध झाले असून, त्यामध्ये महात्मा गांधीजींबद्दलच्या काही दुर्मीळ आठवणी उलगडल्या आहेत.
महात्मा गांधी १९२७ च्या उन्हाळ्यात निपाणी येथे सभेसाठी आले होते. या वेळीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. या वेळी जवळचे उपचाराचे स्थळ म्हणून मिरज येथील मिशन हॉस्पिटलमध्ये तार आली. या तारेमध्ये डॉ. वॉन्लेस यांना महात्मा गांधी अस्वस्थ असून, उपचारासाठी तत्काळ येण्याची विनंती केली होती. त्या वेळी गांधीजी बेळगावजवळील निपाणी येथे एका अनुयायाच्या घरी वास्तव्यास होते. मिरजेपासून निपाणीचे अंतर ६० मल असून तार मिळाल्यानंतर डॉक्टर तत्काळ निपाणीला रवाना झाले. तेथे जाऊन गांधींजींची प्रकृती तपासली असता त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेल्याचे लक्षात आले. या पुढील परिणाम म्हणून या आजाराचे रूपांतर अर्धागवायूमध्ये होण्याची शक्यता होती. काही प्रमाणात महात्मा गांधींच्या चेहऱ्यावरही परिणाम जाणवत होता. गांधीजींना आपला चेहरा बदलल्याचे लक्षात आले नव्हते. कारण, त्यांना त्या अनुयायाच्या घरी आरसाही उपलब्ध नव्हता. या वेळी डॉ. वॉन्लेस यांनी आवश्यक ते उपचार केले आणि गांधीजींच्या प्रकृतीस आराम पडला.
ही सारी आठवण डॉ. वॉन्लेस यांच्या आत्मचरित्रातून नुकतीच उजेडात आली. डॉ. वॉन्लेस यांचे हे आत्मचरित्र मिरज इतिहास संशोधन मंडळाचे कार्यकत्रे निखिल बेल्हारीकर यांनी मिळवले असून, ते सध्या कुमठेकर संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले आहे. हे आत्मचरित्र त्यांना अमेरिकेत रद्दीत मिळाले. डॉ. वॉन्लेस यांनी हे आत्मचरित्र आपली पत्नी लेडी वॉन्लेस यांना सप्रेम भेट दिल्याचा उल्लेख त्यांच्या हस्ताक्षरात आहे. डॉ. वॉन्लेस यांनी भारतातील वैद्यकीय सेवा पूर्ण केल्यानंतर अमेरिकेला जाऊन हे आत्मचरित्र लिहिले. न्यूयॉर्कच्या प्लेिमग रेव्हेल कंपनीने १९२९ मध्ये ‘अॅन अमेरिकन डॉक्टर अॅट वर्क इन इंडिया’ या नावाने डॉ. वॉन्लेस यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध करण्यात आले. या आत्मचरित्रात डॉ. वॉन्लेस यांनी ‘महात्मा गांधी अॅज पेशंट’ नावाने हे प्रकरण लिहिले आहे.
यात म्हटले आहे, की १९२७ च्या उन्हाळ्यात गांधीजींनी बेळगाव-निपाणी परिसरात एकूण सहा ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. ऐन उन्हाळ्यात या सभा घेतल्यामुळे त्याचा त्यांना त्रास झाला होता. यातूनच त्यांना सौम्य स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला. या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी याही उपस्थित होत्या.
या उपचारांच्या आठवणींबरोबरच डॉ.वॉन्लेस यांनी या सभेबद्दलही काही आठवणी लिहून ठेवल्या आहेत. या साऱ्याच स्मरणांना हे आत्मचरित्र सापडल्याने उजाळा आला आहे.
महात्मा गांधींवर निपाणीत डॉ. वॉन्लेस यांच्याकडून उपचार
भारतीयांचे दैवत असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या सेवेची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, अशा शब्दांत डॉ. सर विल्यम वॉन्लेस यांनी आपल्या भावना त्यांच्या आत्मचरित्रात नोंदविल्या आहेत.

First published on: 02-10-2013 at 03:01 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr william james wanless given treatment to mahatma gandhi