साहित्याबाबतच्या आकलनशक्तीचा सध्याच्या चित्रपट क्षेत्रात तीव्र दुष्काळ जाणवतो, असे परखड मत प्रसिद्ध पटकथा-संवाद लेखक अभिराम भडकमकर यांनी आज नोंदवले.
येथील पवनतलाव मैदानावर भरलेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या अखेरच्या दिवशी ‘साहित्य आणि चित्रपटसृष्टी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या निर्माते-दिग्दर्शकांनी त्यामध्ये भाग घेतला. याप्रसंगी भडकमकर म्हणाले की, साहित्य आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांची वेगवेगळी शक्तिस्थाने आणि मर्यादा आहेत. तसेच त्यांच्या निर्मितीमागील प्रयोजनही भिन्न आहे. भोवतालच्या परिसराचे वाचकाला सम्यक भान देत प्रगल्भ बनवण्याचे उद्दिष्ट साहित्यनिर्मितीमागे असते, तर चित्रपट मुख्यत्वे मनोरंजनपर, स्वप्नसृष्टी निर्माण करणारे आणि पलायनवादी असतात. त्याचप्रमाणे चित्रपटांसाठी कथा-पटकथा लिहिणाऱ्या लेखकाला निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते, त्यांचे मित्र, नातेवाईक इत्यादी नाना प्रकारच्या मंडळींच्या कसोटीला उतरावे लागते. ही मंडळी त्यांच्या बुद्धी-कुवतीनुसार वाटेल ते बदल सुचवतात किंवा करतात. त्यामुळे मूळ कथेवर अनेकदा अन्याय होतो. या क्षेत्रातील बहुसंख्य लोकांचा साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही संकुचित असतो. हॉलिवूडमध्ये पटकथा चित्रपटाची कणा मानली जाते, पण आपल्याकडील निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते तसे मानत नाहीत. त्यामुळे येथील चित्रपटसृष्टी आकाराने मोठी झाली, पण साहित्याशी नाळ तुटल्यामुळे आशयसंपन्न झाली नाही. इथल्या मातीतील भाषा, रंग, स्पंदने या चित्रपटांमध्ये अनुभवाला येत नाहीत, असेही भडकमकर यांनी निदर्शनास आणून दिले.
बोलपटाच्या जमान्यापासून साहित्याचा चित्रपटाशी संबंध प्रस्थापित झाला, असे मत व्यक्त करून पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले की, श्री. ना. पेंडसे, गो. नी. दांडेकर, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर इत्यादी नामवंत साहित्यिकांनी मराठी चित्रपट क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. मात्र दिग्दर्शकाची साहित्याशी मैत्री असेल तरच साहित्य आणि चित्रपटाचा मेळ जमतो. हॉलिवूडमध्ये ९० टक्के चित्रपट बेस्ट सेलर कादंबऱ्यांवर आधारित असतात. आपल्याकडे तसे होत नाही. कारण अशा प्रकारच्या चित्रपटांना प्रेक्षकांच्या प्रतिसादाची खात्री नसते.
ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी चित्रपट साहित्याला त्रिमिती प्राप्त करून देतो, असे मत नोंदवले, तर एन. चंद्रा यांनी हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीचा आढावा घेत स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक आशय असलेले आणि स्वातंत्र्योत्तर काळात समाजातील अनिष्ट घटनांवर तुटून पडणाऱ्या नायकांचे चित्रपट निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले. सर्वत्री रविराज गंधे, कांचन अधिकारी, सविता मालपेकर यांनीही परिसंवादात भाग घेतला. संजय भुस्कुटे यांनी सूत्रसंचालन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा