पाणी न देणारेच आता शेतक-यांचे वाटोळे करून राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहात आहेत. मात्र हे कसे शक्य आहे, असा उपरोधिक सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी करीत जिल्हय़ाच्या पाणीप्रश्नावर शेतकरी हिताची भूमिका न घेता आत्मविश्वास गमावलेले काँग्रेसचे काही नेते आपली राजकीय स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली गेले आहेत, अशी टीकाही केली.
पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा ६४वा गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, आमदार भाऊसाहेब कांबळे, साखर कामगार सभेचे सरचिटणीस अविनाश आपटे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, पायरेन्सचे अध्यक्ष एम. एम पुलाटे आदी उपस्थित होते. कार्यक्षेत्रातील ऊसउत्पादक महिलांच्या हस्ते यंदा प्रथमच गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हय़ाच्या पाणीप्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस जाहीरपणे भूमिका स्पष्ट करते. मग जिल्हा काँग्रेस भूमिका का स्पष्ट करत नाही, असा सवाल उपस्थित करून विखे म्हणाले, सध्या पाणीप्रश्न पक्षाच्या झेंडय़ांखाली गेल्याने सर्वसामान्य शेतकरी पाण्यापासून वंचित राहात आहे. काही बोलघेवडे नेते जिल्हय़ातील पाणीप्रश्नावर गप्प बसण्याची भूमिका घेत आहेत. स्वत:चे अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून आत्मविश्वस गमावलेले काँग्रेसचे काही नेते राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली वावरत आहेत. ज्या दुष्काळी भागांसाठी निळवंडे धरण बांधले त्या भागातील जनतेला निळवंडेच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे.
राधाकृष्ण विखे म्हणाले, इंडिया बुल्सला पाणी देण्याच्या निर्णयावरून माझ्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करणा-या शंकरराव कोल्हे यांनी हा निर्णय कोणाच्या उपस्थितीत झाला याचा अभ्यास करावा, इंडिया बुल्सला पाणी देण्याचा निर्णय तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला. या पाण्याच्या मंजुरीपत्रावर पवार यांच्यासह तत्कालीन कृषिमंत्री यांचीही सही आहे. त्यामुळे या प्रश्नावर माझा राजीनामा मागणारे पवार व थोरात यांचे राजीनामे का मागत नाहीत. पुणे जिल्हय़ाचे पाणी नगर दक्षिणेला मिळत नाही. तेथे समन्यायी पाणीवाटपाची भूमिका का लागू होत नाही. जिल्हय़ातील पाणीप्रश्नावर दोन्ही मंत्र्यांच्या भूमिका वेगवेगळय़ा आहेत. शेतक-यांचा पाणीप्रश्न व हक्कासाठी आपल्या मतदारसंघात असंतोष कसा निर्माण होईल, यासाठी काही मंडळी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांचे धाडस या तालुक्यात कधीही यशस्वी होणार नाही. डॉ. खर्डे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी म्हस्के, हभप शालिनी निवृत्ती देशमुख, आपटे यांची भाषणे झाली.

Story img Loader