लोकसत्ता वार्ताहर

सावंतवाडी : महाराष्ट्रातील अनेक मोठ्या देवस्थानांमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला असताना मालवण येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग मधील श्री शिवराजेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय श्री शिवराजेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून घेण्यात आला आहे. मंदिरात प्रवेश करताना अंगप्रदर्शन करणारा अशोभनीय किंवा असभ्य पोशाख परिधान करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मालवणच्या अथांग सागरात छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या किल्ले सिंधुदुर्ग मध्ये महाराजांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी उभारलेले भारतातील पहिले असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्री शिवराजेश्वर मंदिर आहे. किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्याला दरवर्षी भेट देणारे लाखो पर्यटक या मंदिराला भेट देऊन शिवरायांचे दर्शन घेतात. मात्र आता या मंदिरात प्रवेश करताना पर्यटकांना आपल्या पोशाखा बाबत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

गडकोटांचा पवित्र वारसा जपूया – महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृती टिकवूया असा संदेश देत शिवराजेश्वर देवस्थान ट्रस्टने मंदिरात येणाऱ्या पर्यटकांसाठी ड्रेसकोड लागू केला आहे. पर्यटकांनी फाटकी जीन्स, हाफ पॅन्ट, स्कर्ट्स, टाईट्स तसेच सॉक्स, मौजे, शूज किंवा हॅट्स घालून मंदिरात प्रवेश करणे टाळावे, मंदिरात प्रवेश करताना अंगप्रदर्शन करणारा अशोभनीय किंवा असभ्य पोशाख परिधान करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.