MPSC Gazetted Civil Services Joint Prelims Exam-2024: जवळपास वर्षभराने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ झाली. मराठा आरक्षण आणि कृषी विभागाच्या पदांचा समावेश करण्यासाठी ही परीक्षा वर्षभरापासून लांबली होती. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १ डिसेंबरला सदर परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी दोन पेपर उमेदवारांना सोडवावे लागतात. त्यापैकी पेपर दोन हा कलचाचणीचा पेपर आहे. अधिकारी म्हणून काम करताना उमेदवार कोणत्या पद्धतीने विचार करुन निर्णय घेऊ शकतो हे तपासणारा घटक म्हणजे निर्णय क्षमता व व्यवस्थापन कौशल्ये होय. पण यंदा झालेल्या परीक्षेत काही असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. ज्यामुळे भावी अधिकाऱ्यांना नेमकी कोणती निर्णयक्षमता हवी आहे? असा प्रश्न उभा राहतो.

एमपीएससीचे अजब प्रश्न

“राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४” च्या पेपर दोन मध्ये मद्यपानासंदर्भातप्रश्न विचारण्यात आला आहे. “तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्यासोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल?” या प्रश्नासाठी चार पर्यायही दिले गेले आहेत. पहिला पर्याय – मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे. २) दारू पिण्यास नकार देईन. ३) फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन. ४) नकार देईन आणि त्यांना खोटे बोलेल की तुम्हाला यकृताचा आजार आहे.

हे वाचा >> MPSC मंत्र : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा: सीसॅट :निर्णयक्षमता व व्यवस्थापन कौशल्ये

drinking habbit question in exam
मद्यपानासंदर्भात प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारण्यात आला.

या परीक्षेमार्फत अधिकारी निवडले जाणार आहेत. त्यामुळे अशा प्रश्नांची खरेच गरज आहे का? असा प्रश्न आता विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील लोक उपस्थित करत आहेत. एमपीएससीच्या कार्यपद्धतीवर यानिमित्ताने आता टीका होऊ लागली आहे.

या प्रश्नाबरोबरच मुतखड्याच्या आजारासंबंधीही एक प्रश्न विचारण्यात आला आहे. दुषित पाणी प्यायल्यामुळे मूत्रपिंडाच्या त्रासाला सामोरे जावे लागल्यास आणि पाण्याचा अभ्यास करूनही स्वतःलाच हा आजार झाल्यास काय कराल? असा एक प्रश्न विचारण्यात आला आहे. हा प्रश्न आणि त्याला दिलेले पर्याय गोंधळात टाकणारे आहेत.

drinking habbit question in exam २
मूत्रपिंडाच्या आजाराबाबत विचारलेला प्रश्न

२५ ऑगस्टची परीक्षा रद्द झाली होती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द केली होती. परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी आता आक्रमक झाले होते. तारखेअभावी विद्यार्थ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडल्याने काहींनी आयोगाच्या अशा दिरंगाई विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. कृषी विभागातील पदांचा समावेश करण्यासाठी आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलली होती. राज्य शासनाकडूनही आयोगावर परीक्षण पुढे ढकलण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. या संपूर्ण घटनाक्रमानंतर एक डिसेंबरला ही परीक्षा होणार आहे.