दहा लाख लोकसंख्येच्या सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून पिण्यासाठी दोन टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्याचे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी मुंबईत मंत्रालयात आयोजिलेल्या बैठकीत दिले. त्यानुसार उद्या बुधवारी उजनी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. हे पाणी टाकळी येथील औज बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यास किमान आठवडय़ाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शहरात तोपर्यंत पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सोलापूरच्या पिण्याच्या पाणीप्रश्नावर मंत्रालयात झालेल्या बैठकीस जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्यासह शेकापचे नेते, आमदार गणपतराव देशमुख, सोलापूरच्या महापौर प्रा. सुशीला आबुटे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार बबनराव शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार भारत भालके, आमदार हणमंत डोळस, आमदार नारायण पाटील आदींनी हजेरी लावली होती. याच बैठकीत उजनी धरणातील पाणी सोलापूर जिल्हय़ातील शेतीसाठी वितरित करणे, उजनी धरण ते सोलापूर थेट पाइपलाइन पाणीपुरवठा समांतर योजनेचा विचार करणे, सोलापूर शहरातील पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्यांची तपासणी करून त्याचे लेखापरीक्षण करणे, भीमा नदीवरील बंधाऱ्यांवर बॅरिगेट्स बांधणे आदी विषयांवर चर्चा झाली.
सोलापूर शहरासाठी उद्या बुधवारी उजनी धरणातून दोन टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदामंत्री महाजन यांनी दिले. तसेच येत्या १ एप्रिल व ५ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले. सोलापूरसाठी उजनी धरणातून उद्या बुधवारी पाणी सोडण्यात येत असले तरी प्रत्यक्षात हे पाणी टाकळी येथील औज-शिरनाळ बंधाऱ्यात पोहोचण्यास किमान आठवडय़ाचा कालावधी लागणार आहे. याच बंधाऱ्यातून सोलापूरसाठी दररोज ३५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. परंतु सध्या या बंधाऱ्याने तळ गाठले असून जेमतेम चार दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा बंधाऱ्यात शिल्लक आहे. त्यामुळे उजनीतून सोडलेले पाणी बंधाऱ्यात पोहोचेपर्यंत शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सध्या शहराला दर तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. औज बंधाऱ्यातून ३५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. तर उजनी-सोलापूर थेट पाइपलाइन योजनेतून दररोज ६५ एमएलडीपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठय़ाचे तिसरा स्रोत हिप्परगा तलाव असून या तलावात पाणीसाठा जेमतेम आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा