अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी करवीरनगरीत अल्प प्रमाणात हजेरी लावली. दुपारी तासभर पावसाच्या हलक्या सरी बरसत राहिल्या. उकाडय़ाने नागरिक हैराण झाल्याने त्यांना या पावसाने दिलासा मिळाला. शेतकरी मात्र मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
जुलै महिना सुरू झाला तरी पाऊस पडला नसल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला होता. पावसाने प्रदीर्घ काळ ओढ दिल्याने पेरणी वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट शेतक-यावर ओढवले आहे. अशा स्थितीत गुरुवारपासून पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांसह बळीराजा समाधान व्यक्त करीत आहे. शहर व परिसरात पावसाच्या तुरळक सरी बरसत राहिल्या. त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन उकाडा कमी झाला.
महाबळेश्वर, पाचगणीत
पावसाची हजेरी
महाबळेश्वर व पाचगणी येथे आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासून दिवसभर महाबळेश्वर येथे जोरदार पाऊस सुरू आहे. आज सकाळपासूनच पाऊस असल्याने वातावरणात गारवा आला. तर पाचगणी येथे आज हलक्या व मध्यम स्वरूपात पाऊस सुरू आहे. हाच पाऊस वाईच्या पश्चिम भागाकडे दुपापर्यंत सरकला होता. सायंकाळपर्यंत पाऊस सुरूच आहे. पावसाच्या आगमनाचे सर्वानीच स्वागत केले.
लांबलेल्या पावसाचे
साता-यात आगमन
अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या पावसाने आज आगमन केले. सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी वारंवार पडत होत्या. हा भिजपाऊस असाच पडत राहिला तर शेतांना संजीवनी ठरेल असे मत शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
जूनचा संपूर्ण महिना बिनपावसाचा गेला होता. धरणातील पाण्याची पातळीही कमी झाली होती. शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचे आणि जनावरांच्या चा-याचे प्रश्नही ऐरणीवर आले होते. आजपासून सुरू होणा-या पावसामुळे हे प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.