सांगली : स्वामित्व योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात आजअखेर एकूण ३३२ गावांचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण झाले असून ६७ हजार २०९ इतक्या मिळकतींच्या मिळकतपत्रिका व सनद नकाशा तयार झाले आहेत. केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत जिल्ह्यात शुक्रवार, दि.२७ डिसेंबर रोजी गावठाणातील मिळकतधारकांना सनद वितरण केले जाणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख एस.पी. सेठिया यांनी गुरुवारी दिली.
राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्व्हेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामित्व योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेद्वारे गावातील मिळकतधारकाला मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) उपलब्ध करून देताना संबंधित मिळकतधारकाला दस्तऐवजाचा हक्क प्रदान करत आहेत. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या मालकीबाबत मालमत्ताविषयक कागदपत्रे उपलब्ध झाल्याने ग्रामीण क्षेत्रातील लोकांना सक्षम बनविले आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ५० लाख मालमत्तापत्रकांचे आभासी वितरण करताना लाभार्थ्यांना संबोधित करणार आहेत. या निमित्ताने सांगली जिल्हास्तरावर ग्रामविकास पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वितरण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर कडेगांव तालुक्यामधील शिवाजीनगर (न्हावी), बेलवडे, कोतवडे, शिराळा तालुक्यामधील किनरेवाडी, खिरवडे, भाट शिरगावं व जत तालुक्यामधील डोर्ली अशा एकूण ७ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमधील एकूण १ हजार ३४२ लाभार्थ्यांना सनद वाटप करण्यात येणार आहे.